कोविड आयसीयू बेड धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 05:00 AM2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:00:15+5:30
परतवाड्यातील बंद पडलेल्या कुटीर रुग्णालयाच्या जुन्या इमारतीवर लाखो रुपये खर्च करून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या नावे ही उपचार व्यवस्था उभारली गेली आहे. या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ रुग्णांकरिता ४० बेड लावण्यात आले, तर येथून पुढे त्याच आवारातील ट्रामा केअर युनिटच्या इमारतीत १० बेडची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : कोरोना (कोविड-१९) च्या अनुषंगाने मेळघाटसह अचलपूर व लगतच्या परिसराकरिता महत्त्वपूर्ण, बहुउपयोगी अशी उपचार व्यवस्था एक महिन्यापासून दुर्लक्षित आहे. त्याअंतर्गत आयसीयूमधील दहा बेड धूळखात पडले आहेत.
परतवाड्यातील बंद पडलेल्या कुटीर रुग्णालयाच्या जुन्या इमारतीवर लाखो रुपये खर्च करून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या नावे ही उपचार व्यवस्था उभारली गेली आहे. या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ रुग्णांकरिता ४० बेड लावण्यात आले, तर येथून पुढे त्याच आवारातील ट्रामा केअर युनिटच्या इमारतीत १० बेडची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यातील पाच बेडचा आयसीयू कक्ष उभारण्यात आला आहे. यात ऑक्सिजनची व्यवस्थाही आहे. मागील एक महिन्यापासून ही व्यवस्था उभी आहे. या आयसीयू युनिटला व्हेंटिलेटरची प्रतीक्षा आहे.
कोविड-१९ च्या अनुषंगाने उभारल्या गेलेल्या या व्यवस्थेला आवश्यक डॉक्टरांसह परिचारिका व कुशल कर्मचारी वर्गाकरिता ट्रामा लगतच्या शासकीय वसतिगृहातील व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. कोविड रुग्णालयात राबणाऱ्या संभाव्य डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा विश्राम, निवासाकरिता ते वसतीगृह राखीव ठेवण्यात आले आहे. गरज भासल्यास त्यांच्या क्वारंटाईनकरिताही ही व्यवस्था विचाराधीन आहे.
दरम्यान, कोविड रुग्णालयात केवळ फिव्हर क्लिनिक सुरू आहे. थ्रोट स्वॅब देण्याकरिता लोकांना अमरावती येथे पाठविले जात आहे. यात तेथे त्यांना तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे.
एकीकडे परतवाडा शहरातील कोरोना बाधितांची संख्या चारवर गेल्याने होमक्वारंटाइन व इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन होणाºयांची संख्या वाढली आहे. त्या अनुषंगाने स्थानिक स्तरावर उपचाराला गती आली. थ्रोट स्वॅब घेतले जावेत यासाठी कोविड रूग्णालय कार्यान्वित करण्यात आले. मात्र दोन महिन्यानंतरही तेथे पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत.
उपचार व्यवस्था सुरू करा
परतवाड्यातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार व्यवस्था सुरू करा. त्याकरिता आवश्यक डॉक्टर, कर्मचारी व साहित्य उपलब्ध करून द्या. थ्रोट स्वॅब घेण्याची व्यवस्था परतवाड्यात करा, अशी मागणी नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते गजानन कोल्हे यांनी केली आहे.