पॉझिटिव्हिटी वाढली अन् लस संपली, आठ दिवसांपासून लसीकरण बंद; पुरवठ्याची प्रतीक्षा
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 7, 2023 04:40 PM2023-04-07T16:40:28+5:302023-04-07T16:41:11+5:30
महिनाभरात ९९ रुग्णांची नोंद
अमरावती : दोन आठवड्यांपासून कोरोनाने डोके वर काढले आहे. सध्या ३७ सक्रिय रुग्ण आहेत. रोज पाच ते दहा पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत असताना जिल्ह्यात सर्व लसींचा साठा संपल्याने लसीकरण ठप्प आहे. त्यामुळे कसे लढणार कोरोनासी, असा नागरिकांचा सवाल आहे.
जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महिनाभरात ९९ रुग्णांची नोंद झाली. नमुन्यांमध्ये पॉझिटिव्हिटीदेखील वाढती आहे. कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटची लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे बहुतेक रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. सद्य:स्थितीत ग्रामीण भागात दोन महापालिका क्षेत्रात ३५ सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे शासन, प्रशासन व आरोग्य विभागाद्वारे लसीकरणावर जोर आहे.
जिल्ह्यात १७ जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरू झाले आहे. अद्याप ५० टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतलेला नाही. लसीकरणासाठी शहरात १२ ते १५ व ग्रामीणमध्ये प्रत्येक तालुक्यात व मोठ्या पीएचसीमध्ये लसीकरण होत आहे. सध्या बूस्टर डोसवर जास्त जोर आहे. विशेष म्हणजे लसीकरण झालेल्या नागरिकांना संसर्ग झाला तरीही लक्षणे सौम्य असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.