गाईचे दूध अमृत की विष ?
By admin | Published: December 7, 2015 04:45 AM2015-12-07T04:45:38+5:302015-12-07T04:45:38+5:30
शहरात फिरणाऱ्या मोकाट गाई उकिरडे फुंकत असल्यामुळे आता गाईचे दूध मानवी जीवनासाठी अमृत की विष, असा प्रश्न
वैभव बाबरेकर ल्ल अमरावती
शहरात फिरणाऱ्या मोकाट गाई उकिरडे फुंकत असल्यामुळे आता गाईचे दूध मानवी जीवनासाठी अमृत की विष, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गायी घाण व अस्वच्छतेच्या ठिकाणच्या अन्नपदार्थ ताव मारत असल्यामुळे आता दुधातूनही मानवी जीवनात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासन व जनावर मालकांच्या निष्काळजीपणामुळे अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
राज्यभरात गोहत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर हिंदू संघटनांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. गोहत्या बंदीच्या आदेशाचे सर्वत्र पालन केले गेले. मात्र, आता गो-पालनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अमरावती शहरात शेकडो गाई मोकाट फिरताना आढळून येत आहेत. विशेष म्हणजे या गाई उकिरडे फुंकताना आढळून येत आहे. घाण व अस्वच्छतेमधील अन्नपदार्थ खाताना आढळून येत आहे. आधीच शहरात स्वच्छतेचा अभाव आहे. ठिकठिकाणी घाण, कचरा व प्लास्टिक पन्नी दिसून येत आहे. त्यातच गाई उकिरड्यावरील अन्नपदार्थ खात असल्यामुळे त्यांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 'लोकमत'ने केलेल्या सर्वेक्षणातून शहरातील अनेक ठिकाणी गाई घाण व अस्वच्छतेच्या ठिकाणी पडलेले अन्नपदार्थ खाताना दिसून आल्या आहेत.
गाईचे दूध मानवी जीवनासाठी पोषक आहे. मात्र, जर गाय दूषित जागेवरील अन्नपदार्थ खात असेल, तर त्याचा परिणाम मानवी जीवनावर होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आता गाईच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बहुतांश गाईंचे मालक गार्इंना मोकाट सोडून देतात. परिणामी त्या शहरातील उकिरडे फुंकून पोट भरतात.
वैद्यकीय घनकचऱ्यातही शोधतात अन्न
शहरातील बहुतांश रुग्णालयांत वैद्यकीय घनकचऱ्यांची विल्हेवाट योग्यरीतीने लावण्यात येते. मात्र, काही रुग्णालये अद्यापही घनकचरा सार्वजनिक ठिकाणाच्या कचरा कुंडीत टाकतात. अनेकदा गाई वैद्यकीय घनकचऱ्यांतही अन्न पदार्थ शोधताना आढळून आल्या आहेत. इर्विन रुग्णालयातील काही घनकचरा रेल्वे स्थानकांच्या भिंतीशेजारी टाकण्यात आला आहे. तेथे शुक्रवारी रात्री १० वाजता एक गाय वैद्यकीय कचऱ्यात टाकलेले अन्नपदार्थ खात असताना आढळून आली आहे. ही बाब मानवी आरोग्यासाठी घातक ठरणारीच आहे.
वैद्यकीय घनकचरा, घाण व अस्वच्छतेच्या ठिकाणचे अन्नपदार्थ खाल्यास गाय आजारी पडू शकते. त्या गाईचे दूध नागरिकांच्या पिण्यात आल्यास त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. त्यातच गाई प्लास्टिक पन्नी खातात. त्यांच्या पोटात प्लास्टिकचे विघटन होत नाही. अशा स्थितीत तीन ते चार महिन्यांत गाय दगावते. त्यामुळे नागरिकांनी दूध घेताना गायीला काही आजार आहे का, यांची विचारणा केली पाहिजे.
- सचिन बोन्द्रे, सहायक पशुशल्य चिकित्सक, महापालिका.