ठाण्याचे डीबी प्रमुखपद जमादाराऐवजी कॉन्स्टेबलकडे?
By प्रदीप भाकरे | Published: October 27, 2022 06:27 PM2022-10-27T18:27:23+5:302022-10-27T18:28:27+5:30
सीपी डॉ. आरती सिंह यांनी २१ ऑक्टोबर रोजी अंमलदारांच्या बदलीचे आदेश काढले मात्र अद्याप अंमलदार बदलीस्थळी रूजू झालेले नाहीत.
अमरावती : सीपी डॉ. आरती सिंह यांच्या मान्यतेने प्रभारी पोलीस उपायुक्त (मुख्यालय) प्रशांत राजे यांनी २१ ऑक्टोबर रोजी अंमलदारांच्या बदलीचे आदेश काढले. त्याला सहा दिवस उलटत असताना अनेक अंमलदार बदलीस्थळी रूजू झालेले नाहीत. अनेकांनी बदली रद्द करून आणणारच, अशा वल्गना केल्या आहेत. तर दुसरीकडे राजापेठमधील एका डिबीचे सुकाणू हेड कॉन्स्टेबलऐवजी एनपीसीकडे असल्याची बाब उघड झाली आहे. त्या डीबीमध्ये झाडून सारे ‘एनपीसी’ आहेत. एकही जमादार नाही. ‘लोकमत’च्या बदलीबाबतच्या वृत्तानंतर राजापेठमधील ती ‘डीबी’ कशी स्वयंभू झाली आहे, याचे मोठे चर्वितचर्वण अंमलदारांमध्ये रंगले आहे.
वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांनुसार, ठाण्यातील डीबीचे प्रमुखपद साधारणत: हेड कॉन्स्टेबलकडे असते. शहरातील अन्य पोलीस ठाणे प्रभारींनी तो नियम पाळला आहे. मात्र, राजापेठमधील एका डिबीचे प्रमुखपद नायक पोलिसांकडे (पीसी) सोपविण्यात आले आहे. त्यावर मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. डिटेक्शन ब्रॅच असलेल्या त्या शाखेला अनुभवी कर्मचारी हवे असतात. मात्र ती डीबी ‘पीसी’च्याच सहभागाने स्वयंभू बनली आहे. दरम्यान, एखाद्या ठाण्याचा प्रमुख वरिष्ट पोलीस निरिक्षक असतो, तर एखाद्याचा उपनिरिक्षकही. त्यामुळे डीबीचा प्रमुख एनपीसी असल्यास त्यात काहीही वावगे नसल्याची प्रतिक्रिया राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
वरिष्टांची खंत
आम्ही इतके कामाचे आहोत, की ठाणेदार असो वा निरिक्षक आम्हाला सोडतच नाहीत, आणि सोडलेही तरी आम्ही आमची बदली रद्द करून आणण्याची ताकद ठेवतो. अशी वल्गना केली जाते. काहींकडून होणाऱ्या त्या वल्गणा आपण कानाने ऐकल्या. संबंधित प्रमुखांचा जबरदस्त वरदहस्त असल्याशिवाय त्या वल्गणा शक्य नाहीत. थेट राजकारण्याचे व ठाणेदाराच्या नावाने ते दावे उघडपणे केले जातात. त्यात आपण आपल्याच प्रमुखांनी काढलेल्या आदेशाची पायमल्ली करून खाकीची बदनामी करीत आहोत, हे त्यांना समजते, मात्र, सीपींनी केलेल्या बदल्या रद्द करणारा माणूस आपल्याकडे आहे, हे त्यांना सांगायचे असते, अशी खंत आज एका वरिष्ट पोलीस अधिकाऱ्याने बोलून दाखविली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"