‘टीप’ प्रकरणाच्या तपासाची सूत्रे सीपींकडे
By Admin | Published: November 28, 2015 01:07 AM2015-11-28T01:07:22+5:302015-11-28T01:07:22+5:30
ट्रक तोडण्यापूर्वी खात्यातीलच काहींनी दगाफटका करून गुन्हेगारांना ‘टीप’ देण्याचे प्रकरण पोलीस आयुक्तांनी गांभीर्याने घेतले आहे.
मोठ्या फेरबदलाचे संकेत : बड्यांवर कुऱ्हाड?
अमरावती : ट्रक तोडण्यापूर्वी खात्यातीलच काहींनी दगाफटका करून गुन्हेगारांना ‘टीप’ देण्याचे प्रकरण पोलीस आयुक्तांनी गांभीर्याने घेतले आहे. या क्लिष्ट प्रकरणाच्या चौकशीचे सूत्रे आयुक्तांनी हातात घेतली घेतली आहेत. येत्या ४/५ दिवसांमध्ये वस्तुनिष्ठ पुराव्याच्या आधारे या प्रकरणातील दोषींवर मोठी कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत पोलीस आयुक्त व्हटकर यांनी दिले आहेत.
या प्रकरणाची चौकशी पोलीस उपायुक्तांकडे असली तरी प्रकरणाचे गांभीर्य, बड्यांचा सहभाग यामुळे समांतर पातळीवर सुरु असलेली चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचे आज शुक्रवारी आयुक्तांनी सांगितले.
साधारणत: १५ दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यातून चोरलेला ट्रक तोडण्यासाठी अमरावती येत असल्याची माहिती मंगरुळपीर पोलिसांनी शहरत गुन्हे शाखेला दिली होती. कारवाईसाठी गुन्हे शाखेच्या निरीक्षक प्रमेश आत्राम यांनी एपीआयच्या नेतृत्वातील पथकाला नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाठविले.
गुन्हे शाखा, ठाण्यांमध्ये असमन्वय
अमरावती : हे पथक ट्रकची शोधाशोध करत असताना गुन्हे शाखेच्या अन्य एक पथकाला ती माहिती मिळाली व त्यातील चौघांनी मोठा आर्थिक उलाढाल करत तो ट्रक सहीसलामत परतवाड्याकडे पाठविल्याचा आरोप आहे.
या प्रकरणांमध्ये आतापर्यंत गुन्हे शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसह मन्नान या वक्तीचेही बयाण नोंदविण्यात आले आहे. कारवाईदरम्यान गुन्हे शाखा आणि नागपुरी गेट पोलीस ठाण्यामध्ये मोठे फेरबदल होण्याचे सकेत आयुक्तांनी दिले आहेत.
देशी कट्टा प्रकरणात गुन्हे शाखा व नागपुरी गेट पोलीस परस्पर विरोधी वक्तव्य करीत आहेत. जावेद आमचा पंटर असल्याचा दावा एकीकडे गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रमेश आत्राम यांनी केला आहे. तर दुसरीकडे जावेद फरार असल्याची माहिती नागपुरी गेटचे ठाणेदार दत्ता गावंडे यांनी दिली आहे.
जावेद जर पंटर असेल तर तो फरार का? याचे उत्तर मात्र गुन्हे शाखेकडे नाही. या प्रकरणाने गुन्हे शाखेमधील अधिकाऱ्यांच्या श्रेयाच्या लढाईसोबतच ठाणेप्रमुखांमधील असमन्वय सुद्धा उघड झाला आहे. (प्रतिनिधी)