सीपींच्या आकस्मिक भेटीचा संदेश अन् पोलीस शिस्तीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:46 PM2018-08-12T22:46:43+5:302018-08-12T22:47:04+5:30
नवे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर पोलीस ठाण्यांना आकस्मिक भेट देणार असल्याच्या संदेशाने शनिवारी सर्वच ठाण्यांतील वातावरण अचानक शिस्तप्रिय दिसले. ठाणे तर चकाचक झाले, याशिवाय प्रत्येक टेबलावरील पोलीस कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त असल्याचेही चित्र पाहायला मिळाले. सीपींनी अधूनमधून आकस्मिक भेटीचे संदेश किंवा भेटी दिल्यास सर्वच ठाण्यातील कारभार सुधारल्याशिवाय राहणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नवे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर पोलीस ठाण्यांना आकस्मिक भेट देणार असल्याच्या संदेशाने शनिवारी सर्वच ठाण्यांतील वातावरण अचानक शिस्तप्रिय दिसले. ठाणे तर चकाचक झाले, याशिवाय प्रत्येक टेबलावरील पोलीस कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त असल्याचेही चित्र पाहायला मिळाले. सीपींनी अधूनमधून आकस्मिक भेटीचे संदेश किंवा भेटी दिल्यास सर्वच ठाण्यातील कारभार सुधारल्याशिवाय राहणार नाही.
पोलीस खाते शिस्तप्रिय आहे. मात्र, शहरातील काही ठाण्यांतील वातावरण गढूळ झाले आहे. पोलीस ठाण्यात शिस्तप्रिय वातावरण पाहणे, ही आता योगायोगाचीच बाब ठरते. शहर पोलीस विभागाचे 'लिडर तथा व्हिक्टर'च येणार असल्याच्या माहितीने शनिवारी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबेच दणाणले. सीपी कुठल्याही क्षणी ठाण्यात येऊ शकतात. त्यामुळे सर्व रेकॉर्ड योग्य करा, गुन्हेगारांचे रेकॉर्ड तयार ठेवा आदी सूचना प्रत्येक ठाण्याला मिळाली होती. सीपी काय पाहणार, काय दस्तऐवज मागणार याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे प्रत्येक ठाण्यातील पोलीस आपापली कामे नीट पार पाडत होते. अनेकदा काही कर्मचारी ड्रेस परिधान करून कर्तव्यावर येत नव्हते, टोपी घालत नव्हते, टेबल, खुर्च्या अस्ताव्यस्त, कुणी टेबलवर बसून गप्पा मारताना दिसायचे, तर काही वेळकाढू धोरणाने चहा-पानसाठी ठाण्याबाहेर पडत होते. मात्र, नवे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर येणार म्हटल्यावर पोलिसांची भंबेरी उडाली. त्यामुळे वेळकाढून व कामचुकारपणा करणारे पोलीससुद्धा खाकी ड्रेस परिधान करून टोपी हातात घेऊन शिस्तीत दिसून आले. सीपींच्या आगमनाची प्रतीक्षा करतानाच शहरात चेनस्नॅचिंगच्या दोन घटना घडल्या. गाडगेनगर, राजापेठ, फे्रजरपुरा व बडनेरा पोलीस वेळीच कामाला लागले. पोलिसांची पळापळ सुरू झाली. चेनस्नॅचर्सचा शोध सुरू झाल्याने बहुतांश पोलीस यंत्रणा कामी लागली. यात दिवस कसा निघून गेला पोलिसांना कळलेच नाही. त्यातच सीपीनीहीा आकस्मिक भेट दिली नाही.