अमरावती मध्यवर्ती कारागृहात फटाका की बॉम्ब? उडाली खळबळ
By प्रदीप भाकरे | Published: July 6, 2024 11:48 PM2024-07-06T23:48:03+5:302024-07-06T23:48:47+5:30
कारागृहाच्या मागील बाजूने प्लास्टिक बॉलमधून दोन फटाके आत फेकण्यात आले. ते दोन बॅरॅकच्या मधोमध येऊन पडल्याची माहिती उशिरा रात्री समोर आली आहे. ते दोन्ही प्लास्टिक बॉल मध्ये असलेले फटाके, सुतळी बॉम्ब सदृश असल्याची माहिती देखील रेड्डी यांनी दिली आहे.
अमरावती : येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये दोन बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पैकी एका बॉम्ब सदृश चेंडूचा स्फोट झाल्याची माहिती असून त्याला पोलीस व कारागृह प्रशासनाकडून दुजोरा मिळू शकला नाही. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. कारागृह प्रशासनाकडून ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील, उपयुक्त गणेश शिंदे, उपायुक्त कल्पना बारवकर, एसीपी कैलास पुंडकर, एसीपी शिवाजी बचाटे, गुन्हे शाखा पथक व फ्रेजरपुरा पोलीस जिल्हा कारागृहात दाखल झाले आहेत.
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्याशी चर्चा करत असून कारागृहाच्या आत नेमके काय घडले याबाबत बाहेर माहिती आलेली नाही. मात्र कारागृहाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने काहीतरी मोठी घटना घडली असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहर पोलीस आयुक्तालयातील बॉम्बशोधक व नाशक पथकालादेखील पाचरण करण्यात आले असून श्वान पथक देखील तेथे पोहोचले आहे.
यापूर्वी, ज्याप्रमाणे चेंडूमध्ये गांजा आढळला होता. अगदी त्याचप्रमाणे प्लास्टिक चेंडूच्या आकाराची बॉम्बसदृश वस्तू जिल्हा कारागृहात आढळून आल्याची माहिती आहे. दरम्यान कारागृहामध्ये प्लॅस्टिकच्या चेंडूमध्ये दोन फटाके सदृश्य वस्तू फेकण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. पैकी एक फटाका फुटल्याची माहिती देखील त्यांनी उशिरा रात्री दिली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने त्यात दोन प्लास्टिकच्या चेंडूमध्ये फटाके असल्याचे स्पष्ट केले आहे. उशिरा रात्रीपर्यंत कारागृहातील अंतर्गत तपासणी सुरू होती.
कारागृहाच्या मागील बाजूने प्लास्टिक बॉलमधून दोन फटाके आत फेकण्यात आले. ते दोन बॅरॅकच्या मधोमध येऊन पडल्याची माहिती उशिरा रात्री समोर आली आहे. ते दोन्ही प्लास्टिक बॉल मध्ये असलेले फटाके, सुतळी बॉम्ब सदृश असल्याची माहिती देखील रेड्डी यांनी दिली आहे.