मंदिरात हातचलाखी; महिलेकडील पोत पळवली
By प्रदीप भाकरे | Published: October 13, 2023 02:03 PM2023-10-13T14:03:14+5:302023-10-13T14:04:25+5:30
अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल
अमरावती : घराशेजारच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका महिलेकडील २० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हातचलाखीने लंपास करण्यात आली. १२ ऑक्टोबर रोजी १२.४५ ते १ च्या सुुमारास यशोदानगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी अजय इंगळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला.
यशोदानगर येथील अजय इंगळे यांची आई या घराशेजारी असलेल्या समाधी मंदिरात दर्शन करण्याकरीता गेल्या होत्या. तेथे त्यांना एक सडपातळ बांध्याचा तथा कपाळावर पट्टी बांधलेला अनोळखी इसम भेटला. हे मंदिर कशाचे आहे, असे म्हणून मंदिर दाखविण्याची विनंती त्याने महिलेकडे केली. त्यामुळे त्यांनी आरोपीला मंदिर दाखवण्यासाठी आत नेले. त्यावेळी आपल्याला गरिबांना ५०० रुपयांच्या नोटा द्यायच्या आहेत, त्यासाठी तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत ५०० च्या नोटीमध्ये ठेवा व पाच मिनिटांनी पुजा झाल्यावर परत घ्या, अशी बतावणी केली. त्यामुळे महिलेने स्वत:च्या गळ्यातील सोन्याची पोत आरोपीला दिली. त्याने ती निळ्या रंगाच्या पिशवीमध्ये टाकून मंदिरातील समाधीवर ठेवली. त्या दर्शन घेण्याकरीता खाली वाकल्या असता त्या अज्ञात चोराने नजर चुकवून ती पोत लंपास केली. प्रकार लक्षात येताच महिलेने आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत त्या भामट्याने पळ काढला होता.