राष्ट्रीय महामार्गावर अपघातात गारद होताहेत मुकी जनावरे
By admin | Published: September 29, 2016 12:21 AM2016-09-29T00:21:16+5:302016-09-29T00:21:16+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ असे नामानिधान मिळविणारा अमरावती बायपास रस्ता अलिकडे जीवघणा ठरला आहे.
आयआरबीचा जीवघेणा खेळ : मग टोलवसुली कशासाठी ? संरक्षणात्मक उपाययोजनांची गरज
अमरावती : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ असे नामानिधान मिळविणारा अमरावती बायपास रस्ता अलिकडे जीवघणा ठरला आहे.वाहनांच्या अपघातात माणसे मृत्युमुखी पडत असताना मुकी जनावरेही अपघातात गारद होत असल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.बायपास रस्त्यावर जेथे सामान्य जनतेलाच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो,तेथे मुक्या प्राणी अपघातग्रस्त झाल्यास पर्वा कोण करतोय?
सुमारे पाच वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आयआरबी या कंपनीशी करार केला. या कंपनीने चौपदरी रस्ते बांधले. रस्ते बांधणीसाठी खर्च केलेला पैसा वसूल करण्यासाठी नागरिकांच्या माथी टोल मारण्यात आला. नांदगाव पेठनजीक टोलनाका उभारून टोलधाड मारण्यात आली. मात्र, टोलच्या स्वरूपात परत मिळणाऱ्या रकमेच्या मोबदल्यात सुविधांशी मात्र फारकत घेण्यात आली. या चौपदरी रस्त्यावर मुकी जनावरे येवू नयेत, त्यांनी रस्त्यांच्या मधोमध येवू नये,यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या आणि व्यापक उंचीच्या कुंपणभिंती उभारणे अनिवार्य आहे. मात्र, या नियमाला आआरबीने हरताळ फासला आहे. अपघात टाळण्यासाठी आयआरबीने कुठल्याही उपाययोजना केल्या नसल्याचे अमरावरीकरांचे निरीक्षण आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांचा वेग ताशी १०० ते १२० असा अपघाताला निमंत्रण देणारा असतो. या रस्त्यावरील वाहनांचा राबता पाहता रस्ता बांधणीच्यावेळी प्रधान्याने जनतेच्या संरक्षणार्थ आणि अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करायला हव्या होत्या. मात्र, चिकण्या रस्त्याशिवाय त्याला कुठलाही दिलासा मिळत नाही. या बायपासवर माणसांसोबतच जनावरेही आयआरबीच्या जीवघेण्या खेळाला बळी पडत आहेत.
अपघातात म्हैस दगावली
अमरावती बायपास रस्त्यावर २० सप्टेंबरला एका चारचाकी वाहनाच्या धडकेत म्हैस दगावली. यात त्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले.ही म्हैस अचानक रस्त्यावर आल्याने चालकाचा ताबा सुटला .या जोरदार धडकेने त्या म्हशीने तेथेच तडफडत प्राण सोडले. या अपघाताला जबाबदार कोण? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
आयआरबीकडून डोळेडाक
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह आयआरबी या कंपनीने या मार्गावर होणाऱ्या प्राणहानीकडे सोईस्कर दुर्लक्ष चालविले आहे.मोकाट जनावरांमुळे बरेचदा किरकोळ आणि गंभीर अपघात होतात. त्याअनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आयआरबीला विचारणा का केली नाही,असा सवाल मैत्री संघटनेने उपस्थित केला आहे.आयआरबीने रस्त्याच्या दुतर्फा संरक्षण भिंत किंवा कठडे का उभारले नाहीत,असा प्रश्न अमरावतीकरांना पडला आहे.