गर्ल्स हायस्कूल चौकात धडकी भरवणारा पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 10:55 PM2018-08-01T22:55:00+5:302018-08-01T22:55:27+5:30
सकल मराठा आंदोलन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याच्या मुद्द्यावरून पोलिसांनी मराठा आंदोलक व लोकशाहिरांच्या अनुयायांचा चांगलाच धसका घेतला. परिणामी बुधवारी पोलिसांनी गर्ल्स हायस्कुल परिसरात चार टप्प्यात घेराव घालून चप्प्याचप्प्यावर लावलेला तगडा बंदोबस्त नागरिकांच्या मनात धडकी भरवणाराच ठरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सकल मराठा आंदोलन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याच्या मुद्द्यावरून पोलिसांनी मराठा आंदोलक व लोकशाहिरांच्या अनुयायांचा चांगलाच धसका घेतला. परिणामी बुधवारी पोलिसांनी गर्ल्स हायस्कुल परिसरात चार टप्प्यात घेराव घालून चप्प्याचप्प्यावर लावलेला तगडा बंदोबस्त नागरिकांच्या मनात धडकी भरवणाराच ठरला.
राज्यातील काही शहरांमध्ये सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन छेडले. ती धग आजही कायम आहे. अमरावतीतही मराठा बांधवांनी शांतताप्रिय मोर्चा काढून आरक्षणाची मागणी बुलंद केली होती. १ आॅगस्ट रोजी सकल मराठा समाज आंदोलन करतील, त्याचप्रमाणे आ. रवि राणा व लोकशाहिरांचे अनुयायीसुद्धा पुतळा बसवायला येतील, या अपेक्षेने शहर पोलिसांनी गर्ल्स हायस्कूल चौकात तगडा बंदोबस्त लावून ठेवला. गर्ल्स हायस्कूल चौक आंदोलकांचे उगमस्थान असल्याचे गृहीत धरून चप्प्याचप्प्यावर पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस रस्त्यावर पाहून त्या मार्गाने ये-जा करणाऱ्यांच्या मनात धडकीच भरली होती. गर्ल्स हायस्कूल चौकाच्या चारही बाजूच्या रस्त्यावरील १०० मीटर अंतरावर पोलीस बॅरिकेट जवळच बाळगून होते. मोर्चेकरी दिसताच तत्काळ बॅरिकेट लावून त्यांना रोखण्याची पोलिसांनी योजना आखली. गर्ल्स हायस्कूल चौकात एक लाकडी टॉवर बांधण्यात आला. परिस्थितीनुसार टॉवरवरून आंदोलकांवर देखरेख केली जाणार होती. आजूबाजूच्या परिसरातील इमारतीवर पोलीस सज्ज करण्यात आले. पोलीस त्या इमारतीवरून दुर्बीणद्वारे आंदोलकांच्या हालचाली टिपण्यासाठी सज्ज होते. कोणत्याही प्रकारची रिस्क पोलिसांनी घेतली नाही. आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला राहील, या दृष्टीने शंभरावर महिला पोलीस तैनात केले. पोलिसांच्या या तगड्या बंदोबस्तामुळे नियमित ये-जा करणाºयांनीही मार्ग बदलून कार्यालये गाठली.
अशी आहे बंदोबस्ताची रूपरेषा
गर्ल्स हायस्कूल चौकात मोठी गर्दी उसळेल, या अनुषंगाने सहायक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात गर्ल्स हायस्कूल चौकातपाच पोलीस निरीक्षक, १२ पोलीस उपनिरीक्षक, १५० पुरुष पोलीस आणि ८० महिला पोलीस, शिवाय आरसीपी प्लॅटून (आरक्षित), दंगा नियंत्रण पथक सज्ज करूनच ठेवले होते.
अण्णाभाऊ साठे जयंती व सकल मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रिस्क न घेता पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला. काचोडे नामक मराठा आंदोलकास डिटेन केले आहे.
- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.