चिखलदऱ्याच्या नागरिकांनी केली मृत पर्यटकाच्या कुटुंबीयांना मदत
By admin | Published: January 29, 2017 12:15 AM2017-01-29T00:15:40+5:302017-01-29T00:15:40+5:30
देवदर्शनासाठी आलेली ती महिला कुठली कोण, लांबवरच्या ठाणे जिल्ह्यातील ते कुटुंब संकटात सापडले. परगावी येऊन
माणुसकीचा परिचय : ठाण्याला परतण्यासाठी वर्गणीतून गोळा केले २५ हजार रूपये
नरेंद्र जावरे ल्ल चिखलदरा
देवदर्शनासाठी आलेली ती महिला कुठली कोण, लांबवरच्या ठाणे जिल्ह्यातील ते कुटुंब संकटात सापडले. परगावी येऊन आपल्या कुटुंबातील सदस्य महिलेचे कलेवर घेऊन परतण्याची वेळ या पालवे कुटुंबावर आली. जवळ मोजकीच रक्कम मग, मृत महिलेचे पार्थिव नेण्याचीही पंचाईत. दु:ख अनावर होत असताना आर्थिक संकटातून कसे बाहेर पडावे, हा प्रश्नही उद्भवला. पण, चिखलदरावासियांनी पुन्हा एकदा माणुसकीचा परिचय दिला आणि तब्बल पंचवीस हजार रूपये वर्गणी केली आणि या दु:खी कुटुंबाच्या परतीची व्यवस्था करून दिली.
ठाणे जिल्ह्यातील कसाराघाट येथील रहिवासी कल्पना संतोष पालवे (२८) ही महिला कुटुंबातील दहा ते बारा सदस्यांसह चिखलदरा पर्यटनस्थळावर आल्या होत्या. शुक्रवारी आलेल्या पालवे कुटुंबियांनी पूजाअर्चा केल्यानंतर तेथेच मुक्काम केला होता. कुलदैवताच्या पूजनानंतर रात्री निजलेल्या या कुटुंबाला सकाळी उठून मोठा धक्का बसला. लघुशंकेसाठी गेलेल्या कल्पना परत येत असताना चार ते पाच माकडे त्यांच्या मागे लागली. त्यामुळे त्या पळत सुटल्या व तोल जाऊन शंभर फूट दरीत कोसळल्या. दगडावर डोके आपटल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मोजकेच पैसे जवळ असल्याने परत कसे जायचे, ही समस्या पालवे कुटुंबासमोर निर्माण झाली. मात्र, देवी पॉर्इंट संस्थानतर्फे दिनेश खापर्डे, हेमंत डोंगरे यांनी पंधरा हजार तर उर्वरित दहा हजार रूपये नगरसेवक अरूण तायडे, श्रीकृष्ण सगणे, राजेश मांगलेकर, विन्सेट चन्दामी, मनोज शर्मा यांनी गोळा केले. परतवाडा येथील शिवगणेश मंडळाच्या रुग्णवाहिकेसह सलीम न्यूज एजन्सीचे मो. सलीम यांनी वाहनाची व्यवस्था करुन दिली.
अपघातांना बसेना आळा
४विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळाचे सौंदर्य बघण्याकरिता येणाऱ्या पर्यटकांच्या अपघाताच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. येथील भीमकुंड व पंचबोल पॉइंटकडे जाणारे रस्ते जिवघेणे ठरले आहेत. पर्यटकांसाठी पर्यटन महोत्सवावर लाखोंचा निधी खर्च केला जातो. मात्र, चिखलदऱ्यात भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेण्यासाठी कोणतीच स्वतंत्र व्यवस्था येथे उपलब्ध नाही. माकडांचा वाढता हैदोस सुद्धा पर्यटकांच्या जिवावर उठल्याचे या घटनेने सिद्ध झाले आहे.