समाजशील माणूस घडवा

By Admin | Published: January 2, 2016 08:29 AM2016-01-02T08:29:31+5:302016-01-02T08:29:31+5:30

केवळ कायदा आणि कार्यपद्धतीवर व्यवस्था चालत नाही. मूल्य आणि तत्त्वांचीही व्यवस्था चालविण्यात समावेश असणे फार आवश्यक आहे

Create social life | समाजशील माणूस घडवा

समाजशील माणूस घडवा

googlenewsNext

मुख्यमंत्री : डॉ.पंजाबराव देशमुख प्रबोधिनीच्या प्रशिक्षण इमारतीचे लोकार्पण
अमरावती : केवळ कायदा आणि कार्यपद्धतीवर व्यवस्था चालत नाही. मूल्य आणि तत्त्वांचीही व्यवस्था चालविण्यात समावेश असणे फार आवश्यक आहे. त्यामुळे डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधिनीच्या माध्यमातून मूल्य आणि तत्त्वांचे प्रशिक्षण देऊन सामान्य जनतेला उत्तरदायी असेल, असा माणूस घडला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनीच्या विस्तारित प्रशिक्षण इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहराज्यमंत्री रणजित पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे, खा.आनंदराव अडसूळ, आमदार सुनील देशमुख, रवी राणा, रमेश बुंदिले, अनिल बोंडे, महापौर चरणजितकौर नंदा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते आदी उपस्थित होते.
खासगी क्षेत्रात सातत्याने प्रशिक्षण दिले जाते. शासनात मात्र कामातूनच अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित व्हावे लागते. जनतेला उत्तरदायी आणि त्यांच्याप्रती व्यवस्थेत आत्मियता निर्माण करण्यासाठी व्यवस्थेतील लोकांना प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. केवळ कायदे व शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीवर व्यवस्था चालू शकत नाही.
सामान्यांच्या कल्याणासाठी काम करताना मूल्य आणि तत्त्वही जोपासणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशिक्षणाच्या माध्यमातून कायदे आणि शासन कार्यपध्दतीसोबतच मूल्यांचेही प्रशिक्षण दिली गेले पाहिजे. व्यवस्थेतील मूल्य आणि तत्त्व संपल्यास आपण सामान्य माणसाला न्याय देऊ शकणार नाही, ही भावना व्यवस्थेतील प्रत्येकाची असावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.
समाजाने व्यवस्था निर्माण केली आणि व्यवस्थेने समाजाची सेवा करण्याची संधी आपणास दिल्याची जाणीव प्रत्येकात असावी. समाजाचे आपण काही देणे लागतो. या भावनेतून प्रत्येकाने काम केले पाहिजे. डॉ.पंजाबराव देशमुख प्रशासकीय व विकास प्रबोधिनीच्या माध्यमातून समाजासाठी काम करणारे अधिकारी, कर्मचारी निर्माण होतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी प्रशिक्षणातून समाजाचे दु:ख समजून घेणारे अधिकारी तयार व्हावे, असे सांगितले.
अधिकाऱ्यांमध्ये सामाजिक भावना आणि समाजाप्रती सातत्याने काम करण्याची तयारी असावी, असे ते म्हणाले. यावेळी प्रबोधिनीच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांचेही भाषण झाले.
प्रास्ताविक प्रबोधिनीचे संचालक संजय बाहेकर यांनी केले. संचालन उपजिल्हाधिकारी श्यामकांत मस्के यांनी केले, तर आभार विवेक काळेकर यांनी मानले. (प्रतिनिधी)

मार्चच्या अंदाजपत्रकात होणार तुरतूद
डॉ.पंजाबराव देशमुख प्रशासकीय व विकास प्रबोधिनी मध्ये आवश्यक सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी मार्चच्या अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

प्रबोधिनीत अशा आहेत सुविधा
प्रबोधिनीच्या आवारात बांधण्यात आलेल्या या विस्तारीत प्रशिक्षण इमारतीवर ५ कोटी ८९ लाख रूपये खर्च करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रशिक्षण कक्षांसह ई-ग्रंथालय व अन्य सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे
प्रबोधिनीतून प्रशिक्षण घेतलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे सांगितले. प्रशिक्षणाचे महत्त्व विशद करताना प्रबोधिनीने शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे कशी पोहचविता येतील, यादृष्टीने प्रशिक्षण द्यावे, असे यावेळी मनोगत व्यक्त करताना गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितले.

Web Title: Create social life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.