आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:10 AM2021-05-31T04:10:32+5:302021-05-31T04:10:32+5:30
अमरावती : कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची तीव्र कमतरता जाणवत आहे. ही गरज ...
अमरावती : कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची तीव्र कमतरता जाणवत आहे. ही गरज लक्षात घेऊन रुग्णालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा वापर करून त्याच ठिकाणी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. विविध रुग्णालयांनी त्यात सहभागी होऊन युवकांना प्रशिक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
जिल्ह्यात यावर्षी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या राज्यातील युवक-युवतींना इस्पितळांकडे उपलब्ध असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून प्रामुख्याने ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याद्वारे प्रशिक्षित होणारे मनुष्यबळ आरोग्य यंत्रणेमध्ये कार्यरत होण्याकरिता त्वरित उपलब्ध होऊ शकणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय इस्पितळे, वैद्यकीय संस्था तसेच २० पेक्षा अधिक बेडची सोय असणारी खाजगी इस्पितळे सदर कार्यक्रमात व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून सूचिबद्ध होऊन त्याद्वारे प्रशिक्षण देण्यास पात्र होऊ शकणार आहेत तसेच या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत देण्यात येणारे प्रशिक्षण हे उमेदवारांना पूर्णपणे विनामूल्य असून सूचिबद्ध प्रशिक्षण संस्थांना प्रशिक्षणाकरिता टप्पेनिहाय प्रशिक्षण शुल्क महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत अदा करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता इस्पितळांनी गुगल फॉर्मच्या माध्यमातून प्रशिक्षण संस्था नोंदणीसाठी आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याची मुदत ३१ मे अशी आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शासकीय इस्पितळे, वैद्यकीय संस्था तसेच निकषानुसार पात्र ठरणारी खासगी इस्पितळे, वैद्यकीय संस्था आदींनी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.