नव्या ४० तलाठी साझांची निर्मिती

By admin | Published: May 17, 2017 12:07 AM2017-05-17T00:07:22+5:302017-05-17T00:07:22+5:30

वाढती लोकसंख्या, वाढते शेतकरी खातेदार आदींमुळे तलाठ्यांवर कामाचा बोजा वाढला आहे.

The creation of new 40 Talathi Saalas | नव्या ४० तलाठी साझांची निर्मिती

नव्या ४० तलाठी साझांची निर्मिती

Next

शासनाची मंजुरी : तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वाढती लोकसंख्या, वाढते शेतकरी खातेदार आदींमुळे तलाठ्यांवर कामाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे तलाठी साझांची संख्यावाढ करण्याचा निर्णय शासनाने सन २०१४ मध्ये घेतला आहे. प्रत्यक्षात १६ मे २०१७ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. शासनाच्या हिरव्या झेंडीमुळे जिल्ह्यात किमान ४० नवीन तलाठी सांझे वाढणार आहेत.
यासंदर्भात शिफारस समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने मान्य केला होता. मात्र, अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन न झाल्यामुळे प्रस्ताव प्रलंबित होता. आता मात्र हा प्रस्ताव मार्गी लागला आहे.
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात ३ हजार १६५ नवीन तलाठी साझांना मंजुरी देण्यात आली असून ५२८ नवीन मंडळ अधिकारी कार्यालये स्थापित होणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात लोकसंख्येच्या प्रमाणात ४० पेक्षा अधिक तलाठी साझांची संख्यावाढ होणार आहे.
मागील तीन दशकात लोकसंख्या वेगाने वाढली. मात्र, तलाठी साझांची संख्या तेवढीच राहिली. तलाठ्यांवरील कामाचा ताण वाढल्याने साझांची संख्यावाढ करण्यासाठी नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली व अन्य विभागीय आयुक्तांचा समावेश असणारी समिती गठित करण्यात आली. या समितीचा अहवाल वर्षभरापूर्वीच शासनाला सादर झाला व मंत्रिमंडळाने त्या शिफारसींना मान्यता दिली आहे.
राज्यातील सहा महसूल विभागात ३६ जिल्हे, १८४ उपविभाग, ३५८ तालुके, २०९३ मंडळ अधिकारी व १२,३२७ तलाठी साझे आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४०० वर तलाठी साझे आहेत. यामध्ये आता ४० वर साझांची भर पडणार आहे. यामुळे तलाठ्यांच्या कामावरील ताण कमी होणार आहे.
कोतवाल, तलाठी पदांची होणार निर्मिती : राज्यात ३१६५ नवीन तलाठी साझे, ५२८ नवीन मंडळ कार्यालयांची निर्मिती करण्यात येणार असल्यामुळे स्वाभाविकच कोतवाल व तलाठीपदांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच मंडळ अधिकाऱ्यांची पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. यामुळे गावपातळीवरील महसूल यंत्रणेचा ताण कमी होणार आहे.

सन १९८३ मध्ये झाली होती साझांची निर्मिती
राज्यातील तलाठी साझा निर्मितीचे निकष ठरविण्यासाठी सन १९७४ मध्ये कपूर समिती स्थापित करण्यात आली होती. या समितीच्या शिफारसीनुसार सन १९८३ मध्ये तलाठी साझांची निर्मिती करण्यात आली होती. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात साझांची संख्यावाढ करावी, यासाठी तलाठी संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला होता व साझांची संख्यावाढ करण्याचा निर्णय सन २०१४ मध्ये शासनाने घेतला होता.

असे आहेत नवीन साझा निर्मितीचे निकष
नवीन साझा निर्मितीचे विवरण व गुण समितीने निश्चित केले आहेत. त्यानुसार ५०० खातेदार असल्यास ४० गुण,१८०० हेक्टर शेती कार्यक्षेत्र असल्यास ३० गुण, आठ हजार रूपये जमीन महसूल असल्यास १० गुण, तीन हजार लोकसंख्या असल्यास १० गुण व चार गावांची संख्या असल्यास १० गुण असे १०० गुणांचे निकष ठरविण्यात आले होते.

Web Title: The creation of new 40 Talathi Saalas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.