दोन तालुक्यांच्या निर्मितीवर अचलपूर जिल्ह्याची मदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 10:26 PM2019-01-05T22:26:16+5:302019-01-05T22:26:47+5:30

अचलपूर जिल्ह्याच्या मागणीला ३८ वर्षे पूर्ण झालीत. १९८० पासून आजही ही मागणी प्रलंबित आहे. तथापि, चांदूरबाजार तालुक्याचे विभाजन करून आसेगाव पूर्णा आणि चिखलदरा तालुक्याचे विभाजन करून चुरणी तालुका झाल्याशिवाय अचलपूर जिल्हा होणे नाही.

The creation of two talukas, the district of Achalpur district! | दोन तालुक्यांच्या निर्मितीवर अचलपूर जिल्ह्याची मदार!

दोन तालुक्यांच्या निर्मितीवर अचलपूर जिल्ह्याची मदार!

googlenewsNext
ठळक मुद्देमागणीला ३८ वर्षे पूर्ण : राजकीय पाठपुराव्याची निकड, आजी-माजी लोकप्रतिनिधींकडून राज्य शासनाशी पत्रव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर जिल्ह्याच्या मागणीला ३८ वर्षे पूर्ण झालीत. १९८० पासून आजही ही मागणी प्रलंबित आहे. तथापि, चांदूरबाजार तालुक्याचे विभाजन करून आसेगाव पूर्णा आणि चिखलदरा तालुक्याचे विभाजन करून चुरणी तालुका झाल्याशिवाय अचलपूर जिल्हा होणे नाही.
अचलपूर जिल्हानिर्मितीसाठी प्रशासकीय स्तरावरून सन २०१५ मध्ये शासनाकडे जो प्रस्ताव सादर करण्यात आला, त्यात अचलपूर, चांदूरबाजार, अंजनगाव, चिखलदरा, धारणी या पाच तालुक्यांसह आसेगाव पूर्णा आणि चुरणी या प्रस्तावित तालुक्यांचा संभाव्य अचलपूर जिल्ह्यात समावेश आहे. खरे तर अचलपूर जिल्हा व्हावा, ही मागणी १९८० ची आहे. माजी मंत्री वसुधा देशमुख, हरिशंकर अग्रवाल आणि काँग्रेसच्या अन्य मंडळीने त्यावेळी या मागणीच्या अनुषंगाने शासनाकडे निवेदन दिले. याच दरम्यान नागरिक व लोकप्रतिनिधींची सर्वपक्षीय नागरिक कृती समितीही गठित करण्यात आली होती. तत्कालीन एसडीओ खान यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार असताना तत्कालीन विधान परिषद सदस्य वसुधा देशमुख सदनातच उपोषणाला बसल्या होत्या. १५ डिसेंबर १९९८ ला तारांकित प्रश्न ३०,५४० ला अनुसरून आ. बी.टी. देशमुख यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. तीन टर्मपासून अपक्ष म्हणून आ. बच्चू कडू विधानसभेत अचलपूरचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, त्यांच्या पाठपुराव्यासही यश आलेली नाही. अचलपूर जिल्ह्याकरिता विद्यमान आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार युवाशक्तीने ऐन दिवाळीच्या दिवशी ७ नोव्हेंबर १९९९ ला अचलपूर एसडीओ कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यानंतर ८ नोव्हेंबरपासून तब्बल ४२ दिवस साखळी उपोषण केले. १५५ गावातील युवकांनी यात सहभाग दिला. सात हजार लोकांनी उपोषण मंडपास भेटी दिल्या होत्या. पुढे आमदार बच्चू कडू यांनी अचलपूर जिल्ह्यासह १९ मागण्यांकरिता २२ सप्टेंबर २००८ रोजी नागरवाडीत अन्नत्याग आंदोलन केले होते. २००५ पूर्वी मे १९९९ मध्ये तत्कालीन एसडीओ नितीन पाटील यांनीही शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता.
मुघलकाळात अचलपूर होती राजधानी
मुघल काळात अचलपूर हे राजधानीचे शहर होते. त्यावेळी एलिचपूर असे या शहराचे नाव होते. सीपी अँड बेरार प्रांत अस्तित्वात असतानादेखील अचलपूर जिल्हा होता. अचलपूर शहराला ऐतिहासिक, प्राचीन वारसा आहे. अचलपूर जिल्हा झाल्यास मेळघाटचे कुषोपण, बाल-माता मृत्यूवर नियंत्रण मिळविणे सुकर होईल. विदभार्तील काही मोजक्याच ‘अ’ वर्ग नगरपालिकांपैकी अचलपूर एक आहे. प्रशासकीय आणि तांत्रिकदृष्ट्या जिल्हा निर्मितीसाठी सर्वच सुविधा अचलपूरला प्राप्त आहेत. केवळ जिल्हा निर्मितीची शासनाकडून घोषणा होणे बाकी आहे.
शासनकर्ते बदलताच विषय पडतो मागे
विकासात्मकदृष्ट्या मागासलेपण आणि पायाभूत सुविधांचा अभाव अशा कारणांचा अंतर्भाव अचलपूर जिल्हा निर्मितीमागे होत असतो. मात्र, शासनकर्ते बदलताच अचलपूर जिल्हानिर्मितीचा विषय मागे पडल्याचे चित्र आहे. अचलपूर जिल्हानिर्मितीच्या प्रस्तावात चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, धारणी, चिखलदरा या तालुक्यांचा समावेश आहेच तसेच चुर्णी व आसेगाव या दोन तालुक्यांचादेखील प्रस्ताव राहणार आहे. जिल्हा निर्मितीच्या अनुषंगाने अचलपुरात प्रशासकीय इमारतींसह आरोग्य, शिक्षण, सार्वत्रिक सुविधा अगोदरच उपलब्ध आहेत. परंतु, प्रशासकीय बोजा वाढण्याच्या भीतीने राज्य शासन या विषयाला बगल देत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

अमरावती जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. अमरावतीचे विभाजन करून अचलपूर जिल्हा निर्मिती करणे लोकहित व विकासाच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. आमदार होण्यापूर्वीपासून मी याकरिता प्रयत्नशील आहे. आमदार असताना विधानभवनात मी याकरिता उपोषणास बसले होते. यादरम्यान सभापतींनी सभागृहात अचलपूर जिल्हा निर्मितीबाबत आश्वस्त केले होते. यानंतर दोन नवीन जिल्हे निर्माण केले गेलेत. मात्र, अचलपूरकडे दुर्लक्ष केले गेले. अचलपूर जिल्हा व्हावा, हीच अपेक्षा.
- वसुधाताई देशमुख, माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार, अचलपूर.

राज्यात जेव्हा नवीन जिल्हे निर्मित केले जातील तेव्हा अचलपूर जिल्हा अग्रक्रमाने केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले आहे. त्याआधी आसेगाव पूर्णा आणि चुरणी तालुके केल्या जातील. अचलपूर जिल्हा व्हावा याकरिता शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे.
- बच्चू कडू
आमदार, अचलपूर.

अचलपूर जिल्हा निर्मितीबाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. अपेक्षित खर्चही प्रस्तावात नमूद आहे. सध्या अचलपूर जिल्हा निर्मितीच्या अनुषंगाने शासनाकडून कुठलीही विचारणा नाही. प्रस्तावाव्यतिरिक्त कुठलीही माहिती नाही.
- डॉ. व्यंकट राठोड
उपविभागीय अधिकारी

Web Title: The creation of two talukas, the district of Achalpur district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.