पाथरगाव उपसा सिंचन योजनेचे श्रेय अडसड यांनी लाटू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 11:46 PM2018-02-02T23:46:24+5:302018-02-02T23:46:58+5:30
चांदूर रेल्वे तालुक्यातील पाथगाव उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी आ. वीरेंद्र जगताप यांनी मागील दहा वर्षांपासून शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : चांदूर रेल्वे तालुक्यातील पाथगाव उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी आ. वीरेंद्र जगताप यांनी मागील दहा वर्षांपासून शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. आता याचे श्रेय माजी आमदार अरूण अडसड घेतल्याचा आरोप आमला विश्वेश्वर संघर्ष समितीचे अशोक वाढोणकर व येथील माजी सरपंच उमेश केने यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी केला.
अशोक वाढोणकर पुढे म्हणाले, पाथरगाव उपसा सिंचन योजनेतंर्गत येणाºया जळका जगताप, आमला विश्वेश्वर, टेंभुर्णी, सावंगी (मग्रापूर), पाथरगाव व सालोरा (खुर्द) ही गावे कोरडवाहू क्षेत्रात समाविष्ट असून सामाजिक अन्याय विरोधी संघटनेचे अशोक वाढोणकर, भगवान वाघ व त्यांचे सहकारी यांनी पुढाकार घेतला. त्यात फारसे यश न आल्याने वरील मंडळीसह माजी झेडपी सदस्य व तत्कालीन सरपंच उमेश केणे यांनी पाथगाव उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी आ. वीरेंद्र जगताप यांची मदत घेतली.तत्कालीन जलसंपदामंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेला मान्यता प्रदान दिली होती. त्याबाबत पत्रसुद्धा आ. जगताप यांना प्राप्त झाले होते. विशेष म्हणजे २०१० मध्ये अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी योजनेला निधी मंजूर करण्याचे आदेश दिले होते. अरुण अडसड यांचा या कामासाठी पाठपुरावा नाही, असा आरोप अशोक वाढोणकर , उमेश केणे यांनी केला. पत्रपरिषदेला आ. वीरेद्र जगताप, झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, सदस्य सुरेश निमकर, नितीन दगडकर आदी उपस्थित होते
अङसड यांनी ठोस पुरावे दाखवावे; आमदारकी सोडू
पाथरगाव उपसा सिंचन योजनेसाठी सलग दहा वर्षे स्वत: पाठपुरावा शासन, प्रशासन व मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री अन्य ठिकाणी लेखीस्वरूपात पत्रव्यवहार केला. माजी आमदार अरुण अडसड यांनी पाठपुरावा केल्याचे पुरावे दाखवावे; आपण आमदारकीचा राजीनामा देऊ असे, आ. जगताप म्हणालेत
जगतापाचे प्रयत्नच सिंचनासाठी ठरले वरदान
पाथगाव उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी आ. वीरेंद्र जगताप यांनी केलेल्या सलग पाठपुराव्यामुळे वरील योजनेतून २१६३ हेक्टर क्षेत्रांवर सिंचनाची सोय होऊ शकली. ज्यांनी लाभ घेण्याचा प्रयत्न चालविला, त्यांनीच योजनेला सुरूवातीपासून विरोध केल्याचा आरोप वाढोणकर यांनी केला आहे.