स्मशानभूमीत हळदी-कुंकू, तीळ-गूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:30 PM2019-01-21T23:30:55+5:302019-01-21T23:31:19+5:30
अंधश्रद्धेच्या विळख्यातून महिलाशक्तीला बाहेर काढण्यासाठी तालुक्यातील हिवरखेड येथील स्मशानभूमीत ‘जागर स्त्रीशक्तीचा’ मेळावा रविवारी घेण्यात आला. यामध्ये हळदी-कुंकू व तीळ-गुळाचा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला.
गोपाल डहाके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : अंधश्रद्धेच्या विळख्यातून महिलाशक्तीला बाहेर काढण्यासाठी तालुक्यातील हिवरखेड येथील स्मशानभूमीत ‘जागर स्त्रीशक्तीचा’ मेळावा रविवारी घेण्यात आला. यामध्ये हळदी-कुंकू व तीळ-गुळाचा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिवरखेड येथील नवोदय विद्यालयाच्या सुनीता श्रीवास होत्या. उद्घाटन वरूड नगर परिषदेच्या माजी अध्यक्ष जया नेरकर यांनी केले. मार्गदर्शक म्हणून स्त्रीरोगतज्ज्ञ तथा ग्रामगीताचार्य मीना बंदे, मोर्शीच्या सावित्रीबाई फुले मंडळाच्या सचिव मंगला भोजने, तर प्रमुख वक्त्या म्हणून नवोदय विद्यालयाच्या सविता ठाकरे, वरूड येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनाली आंडे, ‘मी सावित्री बोलतेय’ फेम पथनाट्यकार वैशाली आमले, अनसूया ब्राम्हणे (रा. धनोडी), अर्चना भातकुले (रा. मोर्शी), वर्षा मालटे (रा. मोर्शी), रंजना नागले, वैशाली बिसांद्रे, अर्चना आमले, कविता गुळरांधे, शोभा माकोडे आदी विविध क्षेत्रांतील महिलांनी स्मशानभूमीसारख्या आडवळणाच्या व्यासपीठावर एकत्र येऊन आधुनिक प्रखर स्त्रीशक्तीचा परिचय दिला.
स्मशानभूमीत फुलला बगीचा
सत्यशोधक वृक्षमित्र नारायणराव मेंढे हे २० वर्षांपासून हिवरखेड येथील स्मशानभूमीत स्वत: योगदान देत आहेत. त्यांनी या ठिकाणी फळझाडे, फुलझाडे तसेच औषधी वनस्पती उगवल्या आहेत. परिसरातील लोकांची मदत घेऊन या ठिकाणी बसण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
अंधश्रद्धेला मूठमाती
महिला वर्गातील भूत, भानामती, प्रेत, स्मशान याबद्दलची भीती नाहीशी व्हावी, या दृष्टिकोणातून मेंढे यांनी महिला प्रबोधनाचे काम हाती घेऊन प्रथमच संक्रातीचे औचित्य साधून ‘जागर स्त्रीशक्तीचा’ महिला मेळावा, हळदी कुंकू व तीळ-गुळाचा कार्यक्रम स्मशानभूमीमध्ये घेतला. संचालन पूनम डेहनकर यांनी केले.