-तर रिलायन्सविरुद्ध फौजदारी
By admin | Published: February 7, 2015 12:10 AM2015-02-07T00:10:46+5:302015-02-07T00:10:46+5:30
शहरात रिलायन्स कंपनीचे केबल टाकण्याचे काम सुरु असून विवेकानंद कॉलनी परिसरात नियमांना डावलून खोदकाम केले जात आहे.
अमरावती : शहरात रिलायन्स कंपनीचे केबल टाकण्याचे काम सुरु असून विवेकानंद कॉलनी परिसरात नियमांना डावलून खोदकाम केले जात आहे. गुरुवारी या भागाचे नगरसेवक प्रदीप हिवसे यांनी खोदकाम परवानगीची विचारणा केली असता रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी वाद घातला. ही बाब आयुक्तांच्या दालनात शुक्रवारी पोहचली तेंव्हा रिलायन्स कंपनीविरुद्ध फौजदारी करुन कंत्राटदारांना वठणीवर आणण्याचे निर्देश आयुक्त अरुण डोंगरे यांनी दिले.
मागील काही महिन्यांपासून रिलायन्स कंपनीचे ४ जी वेबसेवा पुरविण्याच्या अनुषंगाने शहरात केबल टाकण्याचे काम युद्धस्तरावर सुरु आहे. केबल टाकण्याची परवानगी ही शासन स्तरावरुन देण्यात आली असली तरी महापालिकेने अटी, शर्तीवर शुल्क आकारुन ही परवानगी दिली आहे. मात्र रिलायन्सने काही भागात नियम गुंडाळून केबल टाकण्यासाठीचे खोदकाम सुरु केले आहे.
हे खोदकाम करताना दोन ते तीन महिन्यांपूर्वी करण्यात आलेले रस्ते, पेव्हिंग ब्लॉक बांधकामसुद्धा बाधा पोहचत आहेत.
शहर अभियंत्यांनी घेतली तत्काळ बैठक
केबल टाकताना खोदकाम नियमानुसार व्हावे, यासाठी रिलायन्स कंपनीची मुस्कटदाबी करण्यासाठी शुक्रवारी उशिरा सायंकाळी शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांच्या अध्यक्षेखाली महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांची बैठक पार पडली. यावेळी रिलायन्स कंपनीचे समन्वयक आनंद राऊत यांची कानउघाडणी करण्यात आली. सोमवारपासून खोदकामावर अभियंत्यांचे नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. मालमत्तेचे नुकसान झाल्यास कंपनीविरुद्ध फौजदारी करू, अशी माहिती शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांनी दिली.
फ्रेजरपुऱ्यात वीज गूल
येथील फ्रेजरपुऱ्यात रिलायन्स कंपनीचे केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरु असताना अचानक जमिनीच्या आत असलेली विद्युत परिवठा करणारी तार तुटल्यामुळे परिसरातील वीज गूल झाली आहे. अचानक मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील नागरिक चक्रावून गेले. या भागाचे नगरसेवक अरुण जयस्वाल यांनी वीज गूल झाल्याची बाब महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. तब्बल चार ते पाच तासांनंतर वीजेचा पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली.
सोमवारपासून कामाचे अंकेक्षण
अमरावती : लाखो रुपये खर्चून विकास कामे करीत असताना रिलायन्स कंपनी ही केबल टाकण्यासाठी खोदकाम करीत असेल तर त्याला विरोध केलाच पाहिजे, या अनुषंगानेच नगरसेवक प्रदीप हिवसे यांनी रिलायन्स कंपनीच्या खोदकामाला विरोध करुन ते बंद पाडले. मात्र रिलायन्सच्या कंत्राटदारांनी प्रदीप हिवसे यांच्याशी वाद घातला. हे खोदकाम बंद पाडता येत नाही, शासन, महापालिकेची परवानगी असल्याचा तोरा दाखविला गेला. मात्र हिवसे यांनी खोदकामाचा नकाशा आणि कनिष्ठ अभियंत्यांना बोलवा त्यानंतरच हेच खोदकाम सुरु होईल, अशी ठाम भूमिका घेतल्याने रिलायन्सने घटनास्थळावरुन काढता पाय घेतला. हा प्रकार हिवसे यांनी शुक्रवारी आयुक्त डोंगरे यांच्या निदर्शनास आणून दिला. परिणामी रिलायन्सने खोदकाम करताना नियमांना गुंडाळले असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करु असे आश्वासन आयुक्त डोंगरे यांनी दिले. यावेळी नगरसेवक प्रदीप हिवसे, अमोल ठाकरे, अरुण जयस्वाल आदी उपस्थित होते.