परतवाड्यात धार्मिक स्थळाजवळ फोडले फटाके, आक्षेपार्ह घोषणा; २५ जणांविरोधात गुन्हा, पाच ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2022 12:01 PM2022-10-26T12:01:48+5:302022-10-26T12:06:49+5:30
शहरात पोलीस बंदोबस्त वाढविला
परतवाडा (अमरावती) : दिवाळीच्या दिवशी काही युवकांनी शहरातील धार्मिक स्थळासमोर मोटारसायकलवरून फटाके फोडले. यातील काही फटाके धार्मिक स्थळात तर काही धार्मिक स्थळाबाहेर फुटले. यासंदर्भात इमरान खान सलीम खान यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये युवकांनी आक्षेपार्ह घोषणाही दिल्या असल्याचे म्हटले आहे. या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी २५ जणांवर गुन्हा दाखल केला असून, ५ जणांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, गस्तीवरील पोलिसांना त्या धार्मिक स्थळाबाहेर दोन्ही समुदायातील युवकांचा जमाव आढळून आला. यावर सरकारतर्फे पोलीस कॉन्स्टेबल मंगेश हरिदास फुकट यांनी परतवाडा पोलीस स्टेशनला रीतसर फिर्याद दिली. जमाव करणाऱ्या १३ लोकांसह दहा ते बारा लोकांचा उल्लेख त्यांनी आपल्या फिर्यादीत केला आहे. १२ लोकांची नावेही त्यांनी नमूद केली आहेत. तर सरकारी फिर्यादीवरून पोलिसांनी भादंवि १४३, १४७, १४९, ३३६ कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शहरात सर्वत्र शांतता असून, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ शहरात दाखल आहेत. घटनेच्या अनुषंगाने पाच जणांना अटक करण्यात आली असून, ठाणेदार संदीप चव्हाण यांच्यासह परतवाडा पोलीस फिर्यादीत नमूद अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.
दोन्ही गटांकडून दगडफेक
परतवाडा शहरात दिवाळीच्या रात्री फटाके फोडल्यावरून धार्मिक तेढ निर्माण झाली आहे. दोन्ही समुदायांकडून दगडफेक करून आरडाओरडही करण्यात आली. यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे तातडीने अतिरिक्त बंदोबस्त लावला गेला. दरम्यान, तैनात असलेल्या दोन पोलीस शिपायांच्या पायावर दगडफेकीतील दगड लागले.