रवि राणांसह तिघांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:05 AM2017-07-25T00:05:52+5:302017-07-25T00:05:52+5:30
स्थानिक सह्याद्री कॉलनीतील "ओपन स्पेस"ला तारेचे कुंपण लावल्यामुळे पायवाट बंद झाली आणि दोन भागातील नागरिकांचा वाद रविवारी दुपारी उफाळून आला.
कुत्तरमारेंवर विनयभंगाचा आरोप : सह्याद्री कॉलनीतील जागेचा वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक सह्याद्री कॉलनीतील "ओपन स्पेस"ला तारेचे कुंपण लावल्यामुळे पायवाट बंद झाली आणि दोन भागातील नागरिकांचा वाद रविवारी दुपारी उफाळून आला. यानंतर झालेल्या मारहाण प्रकरणात अतिक्रमण निर्मुलन पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या तक्रारीवरून आ.रवि राणा यांच्यासह सचिन भेंडे व अन्य दोघांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. यादरम्यानमहिलेच्या साडीचा पदर ओढून धक्काबुक्की करणे आणि अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली राजापेठ पोलिसांनी कुत्तरमारेंविरूद्ध विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा नोंदविला आहे.
पोलीस सूत्रांनुसार गणेश कुत्तरमारेंना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी सचिन भेंडेला अटक केली आहे. तर आ. राणांचा याप्रकरणात कितपत सहभाग आहे, याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. गायत्रीनगर ते सह्याद्री कॉलनी मार्गावरील उद्यानासाठी राखीव जागेवर महापालिकेने कुंपण घातले. याकुंपणामुळे काही नागरिकांना अडचण झाली तर काहींसाठी ते सोयीस्कर झाले. यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी रविवारी आ. राणा सह्याद्री कॉलनीत गेले. त्याठिकाणी महापालिकेचे अधिकारीसुद्धा पोहाचले. दरम्यान नागरिकांचा रोष उफाळून आल्यानंतर अतिक्रमण निर्मुलन पथकाच्या गणेश कुत्तरमारेंना मारहाण करण्यात आली. यामध्ये आ. रवि राणा यांनी धक्का देऊन खाली पाडले. त्यामुळे शासकीय कामकाजात व्यत्यत आणल्याचा आरोप कुत्तरमारेंनी तक्रारीतून केला आहे. कुत्तरमारेंच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आ. रवि राणांसह सचिन भेंडे व अन्य दोघांविरूद्ध भादंविच्या कलम ३५३, १८६, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
तर सह्याद्री कॉलनीत हा गोंधळ सुरू असताना एका महिलेला अश्लिल शिवीगाळ करून तीच्या साडीचा पदर ओढून धक्काबुक्की केल्याचा आरोप कुत्तरमारेंवर करण्यात आला आहे. याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी गणेश कुत्तरमारेंविरूद्ध भादंविच्या कलम ३५४, ३२३, २९४ व ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
कुत्तरमारेंना निलंबित करा
महिलेच्या विनयभंगाप्रकरणी गणेश कुत्तरमारे यांना तत्काळ अटक करुन निलंबित करण्याची मागणी युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने करण्यात आली. या संदर्भात पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना सोमवारी निवेदन देण्यात आले. कुत्तरमारे यांना त्वरित अटक करावी, त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा, निलंबित करण्यात यावे, ही कारवाई एका तासात करावी, अन्यथा युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कस्तुरे यांनी दिला.