अखेर गुन्हे शाखेने केली गजानन आत्रामला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 01:07 AM2018-11-19T01:07:26+5:302018-11-19T01:07:48+5:30
घरफोडी, चोरीतील कुख्यात आरोपी गजानन आत्रामसह त्याचा साथीदार शकंर सुभाष बनसोड (रा.भिमनगर) याला अटक केली. आरोपींकडून रामपुरी कॅम्प स्थित मंदिरातून चोरी गेलेल्या रक्कमेपैकी सात हजारांची रोख पोलिसांनी जप्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : घरफोडी, चोरीतील कुख्यात आरोपी गजानन आत्रामसह त्याचा साथीदार शकंर सुभाष बनसोड (रा.भिमनगर) याला अटक केली. आरोपींकडून रामपुरी कॅम्प स्थित मंदिरातून चोरी गेलेल्या रक्कमेपैकी सात हजारांची रोख पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी रामपुरी कॅम्प स्थित श्री कटणीवाले बाबा यांच्या मंदिरातील दानपेटी फोडून चोराने दिड लाखांची रोख लंपास केल्याची तक्रार अनिल सुकनमल झामणणी (रा. कृष्णानगर गल्ली क्र.४) यांनी गाडगेनगर ठाण्यात नोंदविली. तपासानंतर मंदिरातील सीसीटीव्हीची तपासणी झाली. दरम्यान दोन चोरटे दानपेटीतील पैसे चोरताना आढळून आले. सीसीटीव्हीचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर दानपेटीतील पैसे चोरणारा गजानन आत्राम नामक आरोपी असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार गाडगेनगरसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजानन आत्रामचा शोध सुरु केला. गजानन आत्राम हा मद्यपी असल्यामुळे, त्याने घटनेच्या रात्री गौतम नगरात गोंधळ घातल्याचीही माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली होती. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण गवंड, एएसआय विनोद गाडेकर, पोलीस शिपाई विजय पेठे, अजय मिश्रा, दीपक दुबे, नीलेश पाटील, उमेश कापडे, पवन घोम यांच्या पोलिसांचे पथक गजाननचा शोध घेत असताना, तो रविवारी दारुच्या दुकानात आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडील मुद्देमाल जप्त केला.
तडीपार, एमपीडीए कारवाई होण्याची शक्यता
गजानन आत्राम याच्याविरुध्द विविध पोलीस ठाण्यात तब्बल २१ गुन्ह्याच्या नोंदी असून, त्याच्याविरुध्द तडीपारीची किंवा एमपीडीएची कारवाई होण्याची शक्यता आहे. तसे संकेत पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी दिले आहे.