गुन्हे शाखेचे सुकाणू ‘एसबी’कडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:16 AM2021-08-12T04:16:36+5:302021-08-12T04:16:36+5:30
अमरावती : राज्यस्तराहून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी घोषित होताच शहर आयुक्तालयात कोण येत आहे नि कुणाची जिल्हा बदली झाली, ...
अमरावती : राज्यस्तराहून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी घोषित होताच शहर आयुक्तालयात कोण येत आहे नि कुणाची जिल्हा बदली झाली, हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर शहर आयुक्तालयातील अंतर्गत खांदेपालट अपेक्षित आहे. त्यादृष्टीने गुन्हे शाखेचे सुकाणू कुणाकडे जाणार, याबाबत मोठे चर्वित चर्वण होत आहे.
सूत्रांनुसार, गुन्हे शाखेचे प्रमुखपद ‘एसबी’ (स्पेशल ब्रॅंच नव्हे) कडे जाण्याचे दाट संकेत आहेत. मात्र, ते पद मिळविण्यासाठी ‘एमटी’ नसणाऱ्यानेदेखील पडद्याआड हालचाली चालविल्या आहेत. या ‘हॉट फिल्डिंग’मध्ये ‘एसी’देखील कामाला लागल्याचे चित्र आहे. अगदी सुरुवातीला त्यासाठी कोणताही दावेदार भक्कमपणे समोर आलेला नव्हता. मात्र, आता जसजशी १५ ऑगस्ट जवळ येत आहे तशी दावेदारी केली जात आहे. या चढाओढीत ‘एसबी’चे पारडे इतरांच्या तुुलनेत अनुभव, धडाडी व क्लीन इमेज या पातळीवर वरचढ ठरेल की काय, अशी भीती अन्य दावेदारांना सतावत आहे.
पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या विद्यमान प्रमुखांना जिल्ह्यात सात वर्षे पूर्ण झाल्याने ते जिल्हा बदलीस पात्र आहेत. १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान, ती यादी राज्यस्तराहून घोषित होईल. त्याच यादीतून शहर आयुक्तालयात येणारे चेहरेदेखील स्पष्ट होतील. त्यानंतर स्थानिक खांदेपालटास सुरुवात होईल.
बॉक्स
काहींचे ‘वेट ॲन्ड वॉच’
काही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोर आपली ठाणेदारपदी वा गुन्हे, आर्थिक गुन्हे शाखा प्रमुखपदी वर्णी लागणार नाही, अशी शंका अनेकांना आहे. त्यामुळे काही इच्छुकांनी ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.