दिवसा अतिक्रमण, रात्री गोंधळ; पहाटेच्या सुमारास गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2022 05:02 PM2022-02-01T17:02:39+5:302022-02-01T17:15:55+5:30
मिल कामगारांच्या नव्या चाळीलगत फिनले मिलची मोकळी जागा आहे. या जागेवर सोमवारी दुपारी काहींनी खड्डे खोदून खांब उभे करीत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या अतिक्रमणाबाबतची माहिती कोणीतरी फिनले मिल प्रशासनाला दिली.
अमरावती : दिवसा अतिक्रमण केल्यानंतर रात्री गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध पहाटेच्या सुमारास अचलपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मिल कामगारांच्या नव्या चाळीलगत फिनले मिलची मोकळी जागा आहे. या जागेवर सोमवारी दुपारी काहींनी खड्डे खोदून खांब उभे करीत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या अतिक्रमणाबाबतची माहिती कोणीतरी फिनले मिल प्रशासनाला दिली. त्यावर मिलच्या सुरक्षा रक्षकांनी येऊन ते अतिक्रमण उखडून टाकले.
अतिक्रमण उखडले गेल्याचे बघून अतिक्रमणकर्त्यांनी परिसरातीलच काहींवर संशय घेऊन रात्रीला चांगलाच गोंधळ घातला. रात्रीच्या या गोंधळाची माहिती मध्यरात्रीनंतर पोलिसांना मिळाली. तेवढ्याच रात्री पोलीस कुमकही त्या ठिकाणी दाखल झाली. गस्तीवर असलेले अचलपूरचे ठाणेदारही तेथे पोहोचले. त्यांनाही या गोंधळाची झलक बघायला मिळाली.
गोंधळ घालणाऱ्यांनी परिसरातील ज्याच्यावर शब्दांची चौफेर उधळण केली. त्याने अचलपूर पोलिसांकडे गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली. आपल्याविरुद्ध तक्रार झाल्याचे बघून गोंधळ घालणाऱ्यांनीही समोरच्याविरुद्ध तक्रार दिली. यावर अखेर या गोंधळ प्रकरणात दोन्ही पक्षांकडून अचलपूर पोलीस ठाण्याला फिर्याद दिल्या गेल्यामुळे दोन्ही पक्षांकडील प्रत्येकी चार अशा आठ व्यक्तींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. सोमवारच्या मध्यरात्रीनंतर घडलेल्या या गोंधळाची मंगळवारी दबक्या आवाजात चांगलीच चर्चा राहिली.
संबंधित प्रकरणात दोन्ही पक्षांकडील लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चौकशी सुरू आहे.
- माधव गरुड, ठाणेदार, अचलपूर.