अंजनगावच्या जीनमालकांविरुद्ध अखेर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:10 AM2021-06-28T04:10:25+5:302021-06-28T04:10:25+5:30
अमरावती : कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे ११ लाख १८ हजार ७५० रुपयांनी आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अकोट येथील ...
अमरावती : कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे ११ लाख १८ हजार ७५० रुपयांनी आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अकोट येथील शेतकरी मनोज झुने (२५) यांच्या तक्रारीवरून अंजनगाव पोलिसांनी २६ जून रोजी जिनिंग फॅक्टरीचा मालक अब्दुल कदीर शेख उमर व शेख इकबाल शेख उमर (४०, दोन्ही रा. अंजनगाव)विरुद्ध भादंविचे कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कापसाचा मोबदला म्हणून दिलेले धनादेश वटले नसल्याने ही तक्रार नोंदविण्यात आली.
शेतकरी मनोज झुने यांनी त्यांच्या शेतातील ३४ क्विंटल कापूस ५५५० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे अंजनगाव सुर्जी येथील अलउमर जिनिंग फॅक्टरीचे मालक अ.कदीर शेख उमर यांना विकला. तत्पूर्वी अ. कदीरने त्यांना कापसाच्या वजनाकरिता केजीएन वजन काट्यावर पाठविले. तेथे जीनमालक अ. कदीरचा मोठा भाऊ शेख इक्बालने कापसाची क्वालिटी पाहून भाव ठरविला. काटा पावती न देता तोंडी ३४ क्विंटल कापूस भरल्याचे सांगून जीनमध्ये पाठविले. मात्र, नगद रक्कम नसल्याचे सांगून आरोपी अब्दुल कदीर याने झुने यांना १ लाख ८८ हजार ८३० रुपयांचा धनादेश दिला. २९ नोव्हेंबर २०२० रोजी संबंधित बँकेत जाऊन पैसे काढून घेण्याचेही सुचविले. झुने यांनी अकोट येथील बँक शाखेत तो धनादेश टाकला असता, पुरेशी रक्कम नसल्याने तो बाऊंस झाला. त्यानंतर झुने यांनी आरोपी अ. कदीर याच्याकडे वारंवार पैशाची मागणी केली. मात्र, पैसे न दिल्याने त्यांनी अखेर अंजनगाव पोलीस ठाणे गाठले. आपल्यासोबतच आरोपींनी अन्य चार जणांचीदेखील एकूण ११ लाख १८ हजार ७५० रुपयांनी फसवणूक केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.