'प्रिव्हेंटिव्ह' मुळे क्राइम रेट घसरला; २,५८६ एफआयआर
By प्रदीप भाकरे | Published: September 16, 2024 12:37 PM2024-09-16T12:37:39+5:302024-09-16T12:38:57+5:30
गतवर्षीच्या तुलनेत ५८० ने कमी : डिटेक्शन रेट ७० टक्क्यांवर
प्रदीप भाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहर पोलिस आयुक्तालयातील दहा पोलिस ठाणी व सायबर पोलिस ठाण्यात यंदाच्या जानेवारी ते ऑगस्टदरम्यान एकूण २,५८६ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. याच काळात गतवर्षी ती संख्या तब्बल ३,१६६ अशी होती. अर्थात यंदा क्राइम रेट घसरला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५८० गुन्ह्यांची घट नोंदविली गेली आहे. एकूण २५८६ पैकी १८०० अर्थात ७० टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.
गुन्हा झाल्यानंतर आरोपींना पकडण्यासोबत तो घडण्यापूर्वी कुख्यातांवर प्रतिबंध घातल्याने, प्रतिबंधात्मक कारवाई केल्याने क्राइम रेट गतवर्षीच्या तुलनेत घटल्याचे गुन्ह्याच्या सांख्यिकीवरून दिसून येतो. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी क्राइम कंट्रोलसाठी 'प्रिव्हेंटिव्ह'च्या आयुधाचा प्रभावी वापर केला आहे.
त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदादेखील चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी, फसवणूक, दुखापत, विनयभंग, गंभीर व किरकोळ अपघात, दरोडा, विश्वासघात, प्राणांतिक अपघात, दंगलीच्या गुन्ह्यात घट झाली आहे. सन २०२३ च्या जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत एकूण ३१६६ गुन्हे दाखल झाले होते. पैकी ७० टक्के अर्थात २२२१ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला.
शरीराविरुद्धच्या गुन्ह्यात घट
प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाईमुळे शरीराविरुद्धच्या गुन्ह्यात मोठी घट आली आहे. यंदा जानेवारी ते ऑगस्टदरम्यान त्याप्रकारचे ३९० गुन्हे घडले. पैकी ३६१ गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली. त्या घटनांचा उलगडा करण्यात आला, तर गतवर्षी ४७६ गुन्हे दाखल झाले होते.
चोरीचे प्रमाण २६३ ने घटले
गतवर्षी चोरीचे ८१४ गुन्हे नोंदविण्यात आले. तर, यंदा चोरीचे एकूण ५५१ एफआयआर झालेत. चोरीतील डिटेक्शनचे प्रमाण अन्य गुन्ह्यांच्या तुलनेत कमी असल्याने सीपींनी त्या-त्या पोलिस ठाण्यातील डीबी पथकाइसह क्राइम बॅचचीदेखील कानटोचणी केली.
विनयभंगात मोठी कमी
महिला सुरक्षेसंदर्भात महिला सेल अधिक अॅक्टिव्ह करण्यात आला. दामिनी पथके २४ बाय ७ तैनात करण्यात आली. सोबतच, शाळा कॉलेजात विद्याथ्यांचे समुपदेशन सुरू करण्यात आले. सायबर सुरक्षेचे धडे देण्यात आले. पोलिस आयुक्तांपासून पोलिस उपनिरीक्षक व महिला अंमलदार त्यात सहभागी झालेत.
नोंद गुन्हे सन २०२४ सन २०२३
खून १९ १४
खुनाचा प्रयत्न ३६ ३४
बलात्कार ३६ ३५
रॉबरी ४७ ६१
चोरी ५५१ ८१४
विश्वासघात १०४ १२५
फसवणूक ८६ ७५
खोडसाळपणा ३९० ४७६
शासकीय कामात अडथळा १०३ १९८
दुखापत ३९० ४७६
विनयभंग १०३ १९८