विनामास्क फिरणाऱ्या ५१ जणांवर गुन्हे, ४५४ वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:16 AM2021-02-25T04:16:09+5:302021-02-25T04:16:09+5:30
अमरावती: लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन करीत विनामास्क फिरणाऱ्या ५१ जणांवर भादंवि कलम १८८ व इतर कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच ...
अमरावती: लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन करीत विनामास्क फिरणाऱ्या ५१ जणांवर भादंवि कलम १८८ व इतर कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र आल्याबद्दल २ गुन्हे असे एकूण ५३ गुन्हे नोंदविण्यात आले. नियमांचे उल्लंघन करीत विनाकारण फिरणाऱ्या ४५४ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारून त्यांच्याकडून ६५ हजारांचा तडजोड शुल्क दंडस्वरूपात वसूल करण्यात आला. ही कारवाई बुधवारी दिवसभर करण्यात आली.
लॉकडाऊन असतानाही फिक्स पाॅईंटवर कारवाई केली जात नसल्याचे रिॲलिटी चेक केली असता, पोलिसांनी याची दखल पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी घेऊन विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात यावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले होते. मंगळवारी सायंकाळी व बुधवारीसुद्धा पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी रस्त्यावर उतरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची झडती घेतली. काही नाकाबंदी पॉईंट व फिक्स पॉइंटला त्यांनी भेटी देऊन पाहणी केली. नागरिक नियम पाळत नसतील, विनाकारण बाहेर फिरत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे निर्देशही त्यांनी संबंधित ठाणेदारांना दिले. पोलीस आयुक्त स्वत: रस्त्यावर फिरत असल्याने शहरातील पोलीस अलर्ट झाले होते.
बॉक्स:
मंगळवारी ३०५ वाहनचालकांवर कारवाई
वाहतूक पोलिसांनीसुद्धा शहरात ३०५ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारून ई-चलानच्या माध्यमातून ४८ हजार ६०० रुपये दंडस्वरुपात वसूल केले. काही वाहनधारकांकडून जागेवरच दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. विनामास्क फिरणाऱ्या ४१ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले होते.