रवी राणांविरुद्ध अमरावतीत गुन्हे दाखल; संचारबंदी, साथरोग कायद्याचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 09:39 PM2020-05-30T21:39:29+5:302020-05-30T21:40:59+5:30
शासनाची परवानगी न घेता राजापेठ येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन करणाऱ्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवि राणा यांच्याविरुद्ध शनिवारी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आलेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासनाची परवानगी न घेता राजापेठ येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन करणाऱ्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवि राणा यांच्याविरुद्ध शनिवारी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आलेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याचेही कलम त्यांच्याविरुद्ध लावण्यात आले आहे.
आमदार रवि राणा यांनी शनिवारी सकाळी राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. त्यासाठी काही ऑटोरिक्षा आणि १५ ते २० कार्यकर्ते त्यांनी जमविले. उद्घाटन केल्यावर तेथे एकत्रित झालेल्या गरजूंना धान्य व किराणा किटचे वाटप करण्यात आले. ही कृती विनापरवानगी उद्घाटन आणि नियमबाह्य लोक एकत्रित करणारी असल्याच्या कारणावरून गुन्हे दाखल करण्यात आले. राजापेठ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक गजानन मेहेत्रे यांनी याप्रकरणी तक्रार नोंदविली. राणा यांच्यासह कार्यकर्ते व काही ऑटोरिक्षाचालकांवरही हे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. राजापेठचे पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भादंविचे कलम १८८, २६९, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ब, साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ चे कलम २, ३, ४, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ आणि महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक अधिनियम १९९५ चे कलम ३, ४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंबंधी प्रतिक्रियेसाठी आमदार रवि राणा उपलब्ध होऊ शकले नाहीत.