वनविभागातील ‘त्या’ महिला कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:13 AM2021-05-06T04:13:05+5:302021-05-06T04:13:05+5:30
अनिल कडू परतवाडा : अमरावती प्रादेशिक वनविभागांतर्गत परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कर्तव्यावर असताना गोंधळ घालणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांविरुद्ध अचलपूर पोलिसांनी ...
अनिल कडू
परतवाडा : अमरावती प्रादेशिक वनविभागांतर्गत परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कर्तव्यावर असताना गोंधळ घालणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांविरुद्ध अचलपूर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर रात्री उशिरा तिला समज देऊन पतीच्या सुपूर्द केले. ती मद्याच्या अमलाखाली असल्याचे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवालात नमूद केले. तिच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले असून, ते वैद्यकीय यंत्रणेने अचलपूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत. पोलीस हे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवतील. या महिला कर्मचाऱ्यांविरुद्ध अचलपूर पोलिसांसह वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी स्वतंत्र तक्रार दिली आहे.
वनविभागाच्या कार्यालयात गोंधळ घालण्याच्या प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी, तर महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्यावर हात उगारल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अचलपूर पोलिसांनी भादंविचे कलम ३२३, ५०४, ५०६ आणि प्रतिबंधात्मक कलम ११० व १०७ अन्वये गुन्हा दाखल केला. वनाधिकाऱ्यांच्या विनंती वजा शिफारशीनंतर शासकीय महिला कर्मचारी म्हणून तिला अचलपूर पोलिसांनी समज देऊन सोडले आणि ताबा पावतीवर रात्री ११ वाजता तिला तिच्या पतीच्या सुपूर्द केले. यादरम्यान या महिला कर्मचाऱ्याने कार्यालयात घातलेला गोंधळ आणि घडलेल्या प्रकाराविषयी परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड यांनी सविस्तर अहवाल अमरावती प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षकांकडे पाठविला. वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून प्रशासकीय, तर अचलपूर पोलिसांकडून फौजदारी कारवाईचे संकेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी ही महिला कर्मचारी परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयातून सकाळी ११.३० च्या सुमारास कामानिमित्त बाहेर पडली आणि शिरजगाव बंड येथील एका लाकूड व्यापाऱ्याच्या वाहनावर बसून धारणी रोडवरील गौरखेडा लगतच्या एका ढाब्यावर पोहोचली. तेथे अमरावती येथील वनविभागाच्या एका मोठ्या कार्यालयातील लिपिक, परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कक्षेतील वनरक्षक आणि घाटलाडकी येथील वनकर्मचारी हे हजर होते. या महिला कर्मचाऱ्याला बघून संबंधित वनरक्षक जेवण न करताच त्या ढाब्यावरून निघून गेले. घाटलाडकी येथील त्या वनकर्मचाऱ्यांच्या मुलीचे लग्न असल्यामुळे तो ४ मे रोजी परतवाड्यात आला होता. या तिघांनी परतवाडा येथील एका फर्निचरच्या दुकानात सोफासेटची ऑर्डर दिली आणि तेथून ही मंडळी त्या ढाब्यावर जेवणाकरिता पोहोचली. त्यांना फोन करून महिला कर्मचारी ढाब्यावर पोहोचली तेव्हा तिला चालणेही मुश्कील झाले होते. ती कार्यालयासमोरच कोसळली तेव्हा सोबतीला असलेल्या व्यापाऱ्यांसह काहींनी उचलून तिला आत नेले. यानंतर तिने कार्यालयात गोंधळ घातला.
कोट
कार्यालयातील या महिला कर्मचाऱ्याचे वर्तन सुधारावे, तिच्याकडून कार्यालयात नेहमीच घातला जाणारा गोंधळ कमी व्हावा म्हणून वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा प्रयत्न केला गेला. वैद्यकीय तपासणीदरम्यान या महिला कर्मचाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्यावर हात उगारल्यामुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले. अचलपूर पोलिसांनी या महिला कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
- प्रदीप भड, वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा
-----------
अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी ती महिला कर्मचारी अल्कोहोलच्या प्रभावाखाली असल्याचा प्राथमिक अहवाल यंत्रणेला दिला आहे. या महिला कर्मचाऱ्याच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले असून, ते पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.
- डॉ. सुरेंद्र ढोले, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर