सिबिल स्कोअर मागितल्यास बँकांविरुद्ध फौजदारी, देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 9, 2023 09:54 PM2023-05-09T21:54:47+5:302023-05-09T21:55:15+5:30
पीक कर्जासाठी सिबील स्कोअर मागितल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
अमरावती - पीक कर्जासाठी सिबील स्कोअरची आवश्यकता नाही. तसा निर्णय स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने (एसएलबीसी) घेतलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बँकांनी पीक कर्जासाठी सिबिल स्कोअर मागितल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला दिले.
खरीप हंगामपूर्व आढावा सभेसाठी फडणवीस येथील नियोजन भवनात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पीक कर्जासाठी सिबील स्कोरची अट ठेवता येत नसल्याचा निर्णय झालेला आहे. तसे परिपत्रक आरबीआयने काढले आहे. त्यामुळे नाईलाजाने एफआयआर नोंदवावा लागणार असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यात खरिपासाठी बियाण्यांची उपलब्धता आहे. दुबार पेरणीची वेळ आल्यास आवश्यकतेपेक्षा २११ टक्के बियाणे जिल्ह्यात उपलब्ध आहेत. याशिवाय ६५ टक्के शेतकरी घरचेच सोयाबीन बियाणे वापरत आहेत. त्यामुळे बाजारातून फक्त ३५ टक्के बियाणे शेतकरी घेणार आहे. याशिवाय गतवर्षीच्या तुलनेत यावेळी अधिक रासायनिक खतांची उपलब्धता असल्याने यंदाच्या खरिपामध्ये तुटवडा राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.