‘आॅल आऊट आॅपरेशन’ पूर्वीच गुन्हेगार ‘अलर्ट’

By admin | Published: November 3, 2016 12:08 AM2016-11-03T00:08:56+5:302016-11-03T00:08:56+5:30

मागील काही दिवसांपासून पोलीस आयुक्त मंडलिक यांनी शहरात 'आॅल आऊट आॅपरेशन' दणक्यात सुरू केले आहे.

Criminal 'alert' before 'out-of-work' | ‘आॅल आऊट आॅपरेशन’ पूर्वीच गुन्हेगार ‘अलर्ट’

‘आॅल आऊट आॅपरेशन’ पूर्वीच गुन्हेगार ‘अलर्ट’

Next

सीपींच्या गस्तीचे फलित काय? : अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतला धसका
वैभव बाबरेकर अमरावती
मागील काही दिवसांपासून पोलीस आयुक्त मंडलिक यांनी शहरात 'आॅल आऊट आॅपरेशन' दणक्यात सुरू केले आहे. मात्र, सातत्याने राबविली जाणारी ही मोहीम मूळ उद्दिष्टापर्यंत पोहोचेल का, असा सवालही उपिस्थत होतोय. सीपी दररोज रात्री शहरात गस्त घालतात. मात्र, विभागातील काही पोलिसांकडूनच सीपींच्या गस्तीची पूर्वसूचना कायदेभंग करणाऱ्या असामाजिक तत्वांपर्यंत पोहोचत असल्याने गुन्हेगारीवर अंकुश लागणार कसा, हा प्रश्न आहे. कदाचित यामुळेच सतत ‘आॅल आऊट आॅपरेशन’ राबवूनही एकही बडा मासा पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला नाही.
शहरातील मागील काही वर्षांचा गुन्हेगारीचा आलेख चढताच आहे. पोलिसांनी नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, आपातकालिन स्थितीत तातडीने मदत पुरविणे, अपेक्षित असते. मात्र, शहरातील बहुतांश पोलीस यंत्रणा कर्तव्यतत्पर नसल्याने दिवसेंदिवस पोलिसांची प्रतीमा मलिन होऊ लागली आहे. सामान्यांच्या पैशातून शासकीय नोकरांना वेतन मिळते. त्याच पैशातून पोलिसांनाही सेवेचा मोबदला दिला जातो. असे असताना नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलताना प्रचंड कुचराई केली जाते. नागरिक हा प्रकार वेळोवेळी अनुभवत असतात.
घटनेची सूचना मिळाल्यानंतरही पोलीस कधीच वेळेवर पोहोचत नाहीत. घटना घडून गेल्यानंतर कागदी घोडे नाचविण्याइतकीच पोलिसांची जबाबदारी आहे काय, असा सवाल जागरूक नागरिक उपस्थित करीत असतात. नागरिकांच्या सुरक्षेचे भान ठेवा, त्यांच्या मदतीला तत्काळ धावून जा, अशा सूचना वरिष्ठ पोलीस अधिकारी वारंवांर पोलिसांना देतच असतात. तरीही स्थानिक पातळीवर कोणताही बदल दिसत नाही. याकारभारावर नाखुश पोलीस आयुक्तांनी यापूर्वी अनेकदा ठाणेदारांसह हवालदारापर्यंत सर्वांची कानउघाडणी केली आहे. त्यात दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांनीच अवैध व्यवसायावर धाड टाकल्याने पोलीस यंत्रणेला मोठा हादरा बसला.

सीपींनी आकस्मिक गस्त घालावी
अमरावती : तेव्हापासून सीपींनी स्वत:च्या हाती सूत्रे घेऊन मध्यरात्री रस्त्यावर उतरून गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचा पवित्रा घेतला. अवैध व्यावसायिक, गुन्हेगार, नियमभंग करणारे वाहन चालक आदींना वठणीवर आणणे, हा त्यांचा उद्देश होता. मात्र, आता सीपींची ही मोहीम देखील केवळ औपचारिकताच ठरू पाहतेय. कारण, पोलिसांकडून सीपींच्या गस्तीची लिक होणारी माहिती. पोलीस विभागातील काही ‘घर के भेदी’ सीपींच्या गस्तीची पूर्वसूचना गुन्हेगारांपर्यंत पोहोचवितात. असे असेल तर या मोहिमेचा उद्देश सफल होणार तरी कसा?, शिवाय सीपींच्या या मोहिमेमुळे ठाणेदारांसह इतर कर्मचाऱ्यांचा तणाव वाढल्याच्या कुरबुरी जाणवत आहेत.
या मोहिमेमुळे इतर कामे प्रभावित झाल्याच्या अस्पष्ट तक्रारी या विभागातून उमटू लागल्या आहेत. ‘आज साहेबांची नाईट आहे, काही आढळून आल्यास लक्षात ठेवा’, अशी तंबीच काही पोलीस कर्मचारी अवैध व्यावसायिक, गुन्हेगार, असामाजिक तत्वांना देत आहेत. स्वत:ची कातडी वाचविण्याचा हा प्रकार असला तरी यातून काय निष्पन्न होणार? हा खरा प्रश्न आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी केवळ औपचारिकता पूर्ण न करता, या अनुषंगाने विचार करायला हवा. जगजाहीर ‘आॅपरेशन आॅल आऊट’ राबविण्याऐवजी शहरात काही दिवसांच्या अंतराने आकस्मिक गस्त घातल्यास गुन्हेगारांचे खरे स्वरूप तर स्पष्ट होईलच पण त्यांच्याच खात्यातील काही अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पितळही त्यांच्यासमोर उघडे पडू शकेल.

ठाणेदारांसह पोलीस कर्मचाऱ्यांची 'सिक' रजा
सीपींच्या ‘आॅल आऊट आॅपरेशन’ मोहिमेमुळे पोलिसांचा मोठा ताण वाढला आहे. एकीकडे दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांची तर चांगलीच दमछाक उडाली आहे. नाकाबंदी, गुन्हेगाराचा तपास, अवैध धंद्यावर धाडी, वाहनांची तपासणी आदी कारवाईमुळे एसीपी, ठाणेदारांसह काही पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली(?)आहे. सद्यस्थितीत दोन एसीपी, चार ठाणेदार व शेकडो पोलीस कर्मचारी 'सिक' रजेवर गेले आहे.

गुन्हेगार कमी, मद्यपीच सर्वाधिक
आॅल आऊट आॅपरेशनमध्ये पोलीस यंत्रणा सर्वदृष्टीने तपासणी करीत आहेत. अवैध धंदे, गुन्हेगार, विना क्रमांकांच्या वाहनांची तपासणी आदी कारवाई केली जात आहे. मात्र, या कारवाईदरम्यान मोठे गुन्हेगार अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. पोलिसांनी पकडले ते केवळ मद्यपीच. बार व रेस्टॉरेंटमधील महागडी दारू पिण्याऐवजी बहुतांश मद्यपी दुकानातून दारू विकत घेऊन रस्त्यालगत किंवा आडोशाला बसून मद्यप्राशन करतात. गस्तीदरम्यान हे आरोपीच पोलिसांच्या हाती लागतात. आता हिच पोलिसांची उपलब्धी म्हणायची का?

Web Title: Criminal 'alert' before 'out-of-work'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.