अनधिकृत फलकबाजांवर फौजदारीचा दंडुका

By admin | Published: November 8, 2016 12:05 AM2016-11-08T00:05:20+5:302016-11-08T00:05:20+5:30

शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत फलकबाजांवर आता फौजदारीचा दंडुका उगारण्यात येणार आहे.

Criminal bundle on unauthorized panelists | अनधिकृत फलकबाजांवर फौजदारीचा दंडुका

अनधिकृत फलकबाजांवर फौजदारीचा दंडुका

Next

महापालिकेचे आक्रमक पाऊल : तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक
अमरावती : शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत फलकबाजांवर आता फौजदारीचा दंडुका उगारण्यात येणार आहे. या फलकबाजांविरोधात महापालिकेद्वारे अभियान राबविले जाणार असून सार्वजनिक मालमत्तेवर अनधिकृत जाहिराती लावणाऱ्यांविरुध्द कडक कारवाईचे निर्देश उपायुक्त (सामान्य) महेश देशमुख यांनी दिले आहेत.
जयस्तंभ चौक असो वा राजकमल, गांधी चौक असो वा चित्रा चौक, प्रत्येक चौकांमध्ये अनधिकृत जाहिरातदारांनी अतिक्रमण केले आहे. त्याकडे बाजार व परवाना विभागाने हेतूपुरस्सर दुर्लक्ष चालविले आहे. महापालिका क्षेत्रातील विविध चौक, विद्युत खांब आणि महापुरुषांच्या पुतळ्यांच्या सभोवताल फलके आणि अन्य जाहिराती चिटकविण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी जाहिराती लावू नयेत, असा सूचनाफलक जेथे लावलेला आहे, तेथेच हटकून राजकीय नेत्यांसह सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्यांनी फलकबाजी केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर या फलकबाजीला ऊत आला आहे. महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता गल्लीबोळात इच्छुक फलकावर झळकले आहेत. अनधिकृतपणे लागलेली ती फलके, फ्लॅक्स आणि बॅनर काढण्याची सवड बाजार व परवाना विभागाला मिळालेली नाही. त्या अनुषंगाने बाजार परवाना विभागाच्या अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या विभागाने चालविलेली लेटलतिफी कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, अशी तंबी उपायुक्तांनी दिली आहे. राजकमल चौक आणि गाडगेनगर परिसरातील उड्डाणपुलांचे कठडे आणि पिलर्सवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिराती लावण्यात आल्याचे निरिक्षण नोंदविण्यात आले आहे. या ठिकाणी जाहिराती लावण्यास प्रतिबंध असल्याचे सूचनाफलक लावण्यात आले असतानाही फलकबाजांनी महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे निदर्शनास आल्यानंतर यापुढे अनधिकृत जाहिरातदार व प्रकाशकाविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

थेट एफआयआर
शहरात सर्वदूर लागलेले अनधिकृत जाहिरात फलक, पोस्टर, बॅनर्स संबधितांनी स्वत:हून काढून टाकावेत, अन्यथा कुठलीही पूर्व सूचना न देता संबधितांवर महाराष्ट्र मालमत्तेचे विरुपनास प्रतिबंधक अधिनियम १९९५ अंतर्गत पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात येईल, अशी सक्त ताकीद महापालिकेने दिली आहे. अनधिकृत जाहिरातीसंबधित नागरिकांनी १८००-२३३-६४४० आणि १८००-२३३-६४४१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

बाजार परवाना अधीक्षकाला ‘शो-कॉज’
शहरातील अनधिकृत फलकबाजीला लगाम लावण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत बाजार व परवाना विभागाच्या अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी ५ नोव्हेंबरला ही नोटीस बजावली आहे. बाजार परवाना अधीक्षकांना त्याबाबत दोन दिवसांत स्पष्टीकरण द्यावयाचे आहे. बाजार परवाना विभागाकडून अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याबाबतची कारवाई नियमितपणे होत नसल्याने जागोजागी अनधिकृत होर्डिंग्ज चा बाजार वाढला आहे, असे निरीक्षण उपायुक्तांनी नोंदविले आहे. अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याबाबत वारंवार सूचना देऊनही कारवाई होत नसल्याने माध्यमांकडून वृत्त प्रकाशित केले जाते. त्यामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होत असल्याचे कारणे दाखवा नोटीसमध्ये म्हटले आहे. बाजार परवाना अधीक्षक निवेदीता घार्गे यांचे त्यांच्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत दोन दिवसांत उपायुक्त कार्यालयास स्पष्टीकरण सादर करावे, असे आदेश घार्गे यांना देण्यात आलेत.

Web Title: Criminal bundle on unauthorized panelists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.