सीपींच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास विहीर मालकांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:05 PM2018-06-26T22:05:54+5:302018-06-26T22:06:18+5:30
आत्महत्या व हत्येच्या घटनांच्या अनुषंगाने सार्वजनिक व एक्सप्रेस हायवेलगतच्या विहिरींवर जाळी बसविण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी विहीर मालकांना नोटीसद्वारे दिले आहे. जे विहीर मालक सीपींच्या आदेशाचे उल्लंघन करेल, त्याच्यावर भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आत्महत्या व हत्येच्या घटनांच्या अनुषंगाने सार्वजनिक व एक्सप्रेस हायवेलगतच्या विहिरींवर जाळी बसविण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी विहीर मालकांना नोटीसद्वारे दिले आहे. जे विहीर मालक सीपींच्या आदेशाचे उल्लंघन करेल, त्याच्यावर भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्तांच्या आदेशाने सहायक पोलीस आयुक्तामार्फत विहीर मालकांना नोटीस बजावण्यात आली. शहरात काही ठिकाणच्या विहिरी 'सुसाईट स्पॉट' किंवा गुन्हेगारीचे घटनास्थळ बनल्या आहेत. हत्या करून मृतदेह पडीक किंवा निरुउपयोगी विहिरीत टाकल्याच्या काही घटना पुढे आल्यात. तर आत्महत्येसाठी सार्वजनिक व पडीक विहिरींचा वापर केला जात आहे. या विहिरीवर जाळी नसल्याने अशा घटना पुढे येत आहेत. त्यावर खबरदारी व उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने सीपी मंडलिक यांनी शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील विहिरींची यादी तयार करण्याचे निर्देश सर्व ठाण्यांना दिले. त्यानुसार यादी तयार केली. शहरात १६८ वैयक्तिक, १०३ सार्वजनिक व ३३ निरुउपयोगी पडीक विहिरीत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, यापैकी काही विहिरी या ग्रामीण भागातील असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या विहिरींपैकी काही विहिरी वगळण्यात आल्या आहेत. या विहिरींच्या मालकांना जाळ्या बसविण्यासंदर्भात कलम १४४ प्रमाणे नोटीसी बजावण्यात आल्या आहेत. ज्या विहीर मालकांनी जाळ्या बसविल्या नाहीत, त्यांच्यावर १८८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्याचे फर्मान पोलीस आयुक्तांनी सोडले आहेत. त्यानुसार पुढील प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
शीतल पाटील हत्याकांडातील विहीर अजूनही खुलीच
गाडगेनगर हद्दीतील एक्सप्रेस हायवेवरील एक विहीर सुसाईट स्पॉट किंवा गुन्हेगारीचा अड्डाच बनली आहे. शीतल पाटीलची हत्या करून त्यांचा मृतदेह एक्सप्रेस हायवेवरील विहिरीत फेकला. त्याच विहिरीत आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे विहीर मालकाला जाळी बसविण्याचे निर्देश पोलिसांनी दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत त्या विहिरीवर जाळी बसविण्यात आली नाही.