‘त्या’ खाणीमधील अवैध ब्लास्टिंगविरोधात फौजदारी तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:14 AM2021-09-27T04:14:21+5:302021-09-27T04:14:21+5:30
अमरावती : तालुक्यातील परसोडा शिवारालगतच्या अशोक बसेरिया यांच्या मालकीच्या खदानीत जिलेटिन कांड्या वापरून होणारी अवैध ब्लास्टिंग बंद करण्यात यावी, ...
अमरावती : तालुक्यातील परसोडा शिवारालगतच्या अशोक बसेरिया यांच्या मालकीच्या खदानीत जिलेटिन कांड्या वापरून होणारी अवैध ब्लास्टिंग बंद करण्यात यावी, अशी तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली. फ्रेजरपुरा पोलिसांनी ती तक्रार नोंदवून घेतली आहे. सबब, फ्रेजरपुराचे ठाणेदार राहूलकुमार आठवले नेमकी काय कारवाई करतात, याकडे मासोद परसोडा ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
मासोद येथील प्रशांत चांभारे यांनी याबाबत २५ सप्टेंबर रोजी तक्रार नोंदविली. चांभारे यांच्या तक्रारीनुसार, मौजे परसोडा येथे त्यांची वडिलोपार्जित १६ एकर शेती आहे. त्या शेताला लागून अशोक बसेरिया यांची गिट्टीखदान व क्रशर आहे. तेथे ३० ते ४० फूट खोल छिद्र करून त्यात जिलेटिन कांड्या टाकल्या जातात. नंतर त्याचा ब्लास्ट करण्यात येतो. तेथे रवींद्र काळबांडे यांच्या मशिनने ड्रिल करण्यात येतात. तर अकोला येथील एका व्यक्तीकडून रात्री अपरात्री खदानीत अवैधरित्या जिलेटिन ब्लास्ट केला जातो. रात्रीच्या वेळी जिलेटिन पुरले जाते. क्रशरच्या धुळीमुळे आपल्या शेताचे नुकसान होत असून, शेतातील विहिरीसह अन्य विहिरींची पाणीपातळी कमी होत असल्याचे वास्तव तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
////////
बोअर ब्लास्टिंगमुळे मजुर येईनात
त्या खदानीत कधीही केव्हा बोअर ब्लास्टिंग केले जात असल्याने मजूर यायला तयार होत नाहीत. ब्लास्टिंगमुळे येणारे दगड, दूषित धूर, हादऱ्यामुळे शेत खराब झाले आहे. त्यामुळे क्रशर मालक अशोक बसेरिया, मशीन चालक रवींद्र काळबांडे व अकोला येथील जिलेटिनधारक त्या अज्ञात बंदूकवाल्याविरूद्ध विस्फोटक प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करावी, अशी विनंती चांभारे यांनी केली आहे.
//////////////
कोट
मासोद येथील एका खाणीमध्ये होणाऱ्या ब्लास्टिंगबाबत ऑनलाईन तक्रार प्राप्त झाली. चौकशी करण्यात येईल.
राहुलकुमार आठवले, ठाणेदार, फ्रेजरपुरा