अमरावतीत हिस्ट्रीशिटरचा दिवसाढवळ्या खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 03:35 PM2019-11-25T15:35:04+5:302019-11-25T15:56:52+5:30
शहरातील वालकट कम्पाऊंड परिसरातील जाफरजीन प्लॉट येथे सोमवारी दुपारी १२.३० ते १२.४५ च्या सुमारास एका ४७ वर्षीय हिस्ट्रीशिटरचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: शहरातील वालकट कम्पाऊंड परिसरातील जाफरजीन प्लॉट येथे सोमवारी दुपारी १२.३० ते १२.४५ च्या सुमारास एका ४७ वर्षीय हिस्ट्रीशिटरचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. शेख हसन शेख हुसैन ऊर्फ नानिका हसन (रा. आझादनगर) असे मृताचे नाव आहे. न्यायालयातील एका प्रकरणात तारखेवर उपस्थित राहून तो दुचाकीने वालकटमार्गे घराकडे निघाला होता. त्याच्यासोबत सुभाष खुरखुरैया (६०, रा. विलासनगर) हा नोकर होता. जाफरजीन प्लॉट येथे दुचाकी व आॅटोरिक्षाने आलेल्या पाच जणांनी प्रथम दुचाकी चालवित असलेल्या नानिका हसनच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकली. बेसाबध असतानाच त्याच्या तोंड, मानेवर धारदार शस्त्राने वार करून हल्लेखोर पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून कोतवाली पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नानिका हसनला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. यादरम्यान रुग्णालय परिसरात विशिष्ट समुदायाचा मोठा जमाव जमला होता.
नानिका हसन हा गुन्हेगारी विश्वात सक्रिय होता. गांजा तस्करी, जुगार तसेच ४० ते ४५ गुन्हे त्याच्यावर नोंदविले गेले आहेत. पोलिसांच्या चार पथकांनी शोधकार्य राबवून पाचही आरोपींना ताब्यात घेतले. त्याच्या हत्येचे तार काही वर्षांपूर्वी शहरात घडलेले सल्लू हत्याप्रकरणाशी जुळले असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणात तो मुख्य आरोपी होता.