मारहाणप्रकरणी अमडापूरच्या आजी-माजी सरपंचांवर गुन्हे
By admin | Published: April 9, 2016 12:04 AM2016-04-09T00:04:56+5:302016-04-09T00:04:56+5:30
अमडापूर ग्रामपंचायतीत मागील काही दिवसांपासून राजकीय वाद सुरु आहे. यातूनच माजी आणि विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये बुधवारी वाद झाला.
वरूड : अमडापूर ग्रामपंचायतीत मागील काही दिवसांपासून राजकीय वाद सुरु आहे. यातूनच माजी आणि विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये बुधवारी वाद झाला. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींच्या आधारे आजी-माजी सरपंचासह चार जणांविरूध्द गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली आहे.
पोलीस सूत्रानुसार, अमडापूर ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व आहे. सारिका सोनारे या येथील सरपंच आहेत. गावविकासाची कामे सुरु असताना विरोधकांनी वरिष्ठांकडे तक्रारी करुन भ्रष्टाचाराचे आरोप केल्याच्या कारणावरून आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये वारंवार खटके उडत होते. ६ एप्रिल रोजी सरंपचा त्यांच्या पतीसोबत ग्रा.पं.ची विहीर पाहायला गेल्या होत्या. दुचाकीने परत येत असताना आरोपी सुधाकर गुडधे यांनी शिवीगाळ करून सरपंचाच्या पतीला मारहाण केली.
घटनेची तक्रार सारिका सोनारे यांनी पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरुन सुधाकार बाबूराव गुडधे, विद्याधर गुडधे यांचे विरुध्द कलम ३५४(अ),३२४,२९४,३४ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. सुधाकर गुडधे यांनी मारहाणीची तक्रार दिल्यावरुन पोलिसांनी सरपंचाविरूध्द गुन्हे नोंदविले आहेत. याप्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)