पावसाअभावी २१ मंडळात पिकांची भीषण स्थिती; पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरीच्या ५० ते ६० टक्केच पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 06:34 PM2023-10-02T18:34:47+5:302023-10-02T18:35:25+5:30
जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात पावसाची ३१ टक्के तूट आहे. फक्त चांदूरबाजार वगळता उर्वरित १३ तालुक्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही.
अमरावती : पावसाळ्याच्या चार महिन्याच्या कालावधीत २१ महसूल मंडळात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ५० ते ६० टक्केच पाऊस झाला. पावसाची मोठी तूट असल्याने या मंडळांमध्ये पिकांचे मोठे झाले आहे. यामुळे सरासरी उत्पादनात मोठी घट येणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात पावसाची ३१ टक्के तूट आहे. फक्त चांदूरबाजार वगळता उर्वरित १३ तालुक्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही. यामध्ये पाच तालुक्यात फक्त ५० ते ६० टक्क्यांदरम्यान पाऊस पडलेला आहे. या तालुक्यांसह अन्य काही तालुक्यांमधील तब्बल २१ महसूल मंडळात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांदरम्यान पाऊस पडल्याने याचा सर्वच घटकावर परिणाम होत आहे.
दर्यापूर मंडळात फक्त ३९ टक्केच पाऊस
पावसाळ्यात धारणी मंडळात (५५ टक्के), धूळघाट (४५), सावलीखेडा (५४), साद्राबाडी (५४), वलगाव (४८), भातकुली (५३), आसरा (४४), खोलापूर (५४), दर्यापूर (३९), दारापूर (५०), खल्लार (४६), सामदा (५४), थिलोरी (५९), वडनेर (५२), येवदा (५९), अंजनगाव (५७), विहिगाव (५८), सातेगाव (५८), रासेगाव (४८), परसापूर (४६) व पथ्रोट मंडळात ५२ टक्के पाऊस झाला आहे.