पीक विमा कंपनीने नाकारले ४ हजार अर्ज; तक्रारींचा पाऊस
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: October 9, 2023 06:40 PM2023-10-09T18:40:51+5:302023-10-09T18:41:04+5:30
अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाअभावी तर काहींमध्ये अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेले आहे.
अमरावती : काही तालुक्यात पावसाअभावी तर काहींमध्ये अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेले आहे. या पिकांची भरपाई मिळावी, यासाठी पीक विमा कंपनीकडे तक्रारींचा पाऊस पडला आहे. आतापर्यंत ८२,००५ इंटिमेशन कंपनीकडे दाखल झाल्या आहेत. कंपनीद्वारा आतापर्यंत ६१,६४० अर्जांची पाहणी करण्यात आलेली आहे. याशिवाय विविध कारणांनी ३९४७ अर्ज नाकारले आहेत.
यंदा पावसाअभावी महिनाभर उशिराने पेरण्या झाल्या व जुलै महिन्यात ४४ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे किमान ८० हजार हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अहवाल आहे. त्यामुळे योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पूर्वसूचना कृषी विभाग, संबंधित बँक, ॲप व पीक विमा कंपनीकडे दाखल केल्या आहेत. यासाठी कंपनी स्तरावर पंचनामे सुरू असले तरी मंदगतीने प्रक्रिया होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.