जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेवर पीक विमा कंपनीचा आक्षेप; जिल्हा समितीच्या बैठकीत सुनावणी
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: October 6, 2023 05:44 PM2023-10-06T17:44:23+5:302023-10-06T17:44:51+5:30
४१ पैकी चार मंडळांसाठी कंपनी राजी
अमरावती : ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी येत असल्याने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी २१ सप्टेंबरला ४१ महसूल मंडळांसाठी अधिसूचना काढली होती. ही अधिसूचना पीक विमा कंपनीला बंधनकारक असताना कंपनीने यावर जिल्हा समितीकडे आक्षेप नोंदविला आहे. यावर गुरूवारी सुनावणी घेण्यात आली.
अधिसूचनेतील ४१ महसूल मंडळांसाठी असलेली अधिसूचना पीक विमा कंपनीला बंधनकारक असताना फक्त अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चार मंडळांमध्ये अग्रीम देण्यास कंपनी राजी असल्याची माहिती आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी जिल्हा समितीच्या बैठकीत कंपनीचे अधिकारीदेखील उपस्थित होते. पाच सदस्यीय समितीद्वारे पीक पाहणी करण्यात आली. यामध्ये चार सदस्यांचे मत उत्पादनामध्ये ५० टक्क्यांपेक्षा घट येणार असल्याचे म्हणणे असताना कंपनी प्रतिनिधींचा मात्र विरोधाचा सूर आहे.