पीक विमा भरपाईत कंपनीचेच चांगभले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:12 AM2021-05-21T04:12:55+5:302021-05-21T04:12:55+5:30
गजानन मोहोड अमरावती : जिल्ह्याची पैसेवारी ४७ असल्याने सर्व तालुक्यांत दुष्काळस्थिती असताना विमा कंपनीच्या लेखी मात्र, ऑलवेल आहे. खरीप ...
गजानन मोहोड
अमरावती : जिल्ह्याची पैसेवारी ४७ असल्याने सर्व तालुक्यांत दुष्काळस्थिती असताना विमा कंपनीच्या लेखी मात्र, ऑलवेल आहे. खरीप २०२० च्या हंगामात कंपनीकडे १,८५,६०१ शेतकऱ्यांचा १०९ कोटी ४१ लाख ९७ हजार ८२२ रुपयांचा प्रीमियमचा भरणा करण्यात आला होता. पिकांच्या प्रतिकूल परिस्थितीतही विमा कंपनीद्वारा फक्त ४९,९३७ शेतकऱ्यांना ६२ कोटी ६३ लाख ३२ हजार ०१२ रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही शुद्ध फसवणूक असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०१६ च्या खरीप हंगामापासून राबविण्यात येत आहे. यापूर्वीच्या योजनांमध्ये शेतकऱ्यांना भरपाई कमी मिळून फसगत व्हायची म्हणून ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात या योजनेतही शेतकऱ्यांची तीच गत झालेली आहे. मागच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १,८५,६०१ शेतकऱ्यांनी १,७३,०९८ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला होता. यासाठी १५,६६,२४,२३२ रुपयांचा हप्ता कंपनीकडे केला. याशिवाय राज्य व केंद्र शासनाचे प्रत्येकी ४६,८७,८६,७९५ असे एकूण १०९,४१,९७,८२२ रुपयांचा प्रिमियम कंपनीकडे जमा करण्यात आलेला आहे. कंपनीद्वारा मात्र, ४९,९३७ शेतकऱ्यांना ६२,६३,३२,०१२ रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.
मागच्या हंगामात सुरुवातीला पाऊस नसल्यामुळे मूग, उडीद सारखी अल्पावधीतील पिके बाद झाली होती. त्यानंतर ऑगस्टपासून पावसाने रिपरीप लावली ती नोव्हेंबरपर्यंत सुरू होती. या परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे पीक जाग्यावरच सडले. याशिवाय गंजीदेखील पावसाने खराब झाल्या. संपूर्ण सोयाबीनचे पीक उद्ध्वद्वस्त झाले. याशिवाय सततच्या पावसामुळे कपाशीच्या बोंडाला बुरशीजन्य रोगामुळे बोंडसड झाली. गुलाबी बोंडअळीनेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरिपाचे सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्हा प्रशासनाद्वारा ४७ पैसेवारी जाहीर करण्यात आली. या नुकसानाकरिता शासनाद्वारा ३,१४,८७० हेक्टर पिकासाठी ३३७.०६ कोटींची भरपाई देण्यात आली. कंपनीद्वारा मात्र, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देण्यात आल्याचा आरोप होत आहे.
बॉक्स
असा मिळाला पीक विमा (हेक्टर/रुपये)
पिकाचे नाव प्रीमियम भरणा शेतकरी पात्र भरपाई
उडीद २,७७,११,९०८ ५,८०२ ५,२१,९१०४९
मूग ७,९२,७६,१७० १९,२६९ ३४,३६,५९,९६३
तूर ६,१५,५०,७२४ २,५३० ७८,६३,१५५
ज्वारी १९,२५,६२३ ५६ १,९५,८९२
धान २,१६,४३२ ४ १५,७३९
कपाशी १६,५०,२२,०६३ २,६१२ १ ३७,०६,०४८
सोयाबीन ७५,८४,९४,९०२ १९,६६४ २०,८७,००,१६६
बॉक्स
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांना ३.१८ कोटी
परतीच्या पावसामुळे पिकांचे जे नुकसान झाले त्या करीता ३,५९८ शेतकऱ्यांना ३,१८,९९,०३१ रुपयांची भरपाई देण्यात आालेली आहे. यामध्ये कपाशीसाठी फक्त ३३८ शेतकऱ्यांना २५,०७,२५५ रुपये तर सोयाबीनसाठी २,५२६ शेतकऱ्यांना२,६८,७५,६०९ रुपयांची भरपाई देण्यात आलेली आहे. याशिवाय उडदाला ३,८९,९८० व मुंगासाठी १२,४२,३३३ रुपयांची भरपाई देण्यात आलेली आहे.
बॉक्स
काढणीपश्चात नुकसान, ७०२ शेतकऱ्यांना भरपाई
पिकाच्या संवगणीनंतर परतीच्या पावसाने सर्वाधिक सोयाबीनचे नुकसान झालेले आहे. यात ६९४ शेतकऱ्यांना १,१४,३६,२७५ रुपयांची भरपाई विमा कंपनीद्वारा देण्यात आलेली आहे. याशिवाय कपाशीसाठी सहा शेतकऱ्यांना ३३,२५३, धानासाठी एका शेतकऱ्याला ९,१५१ रुपये याशिवाय तुरीसाठी एका शेतकऱ्याला ६,६४० रुपयांची भरपाई देण्यात आलेली आहे.
बॉक्स
अशी आहे. तालुकानिहाय भरपाई
अचलपूर तालुक्यात ७५,७८,३२५ रुपये, अमरावती १,५६,९७,४७२ रुपये, अंजनगाव सुर्जी ४ १४,००,२८९ रुपये, भातकुली २,०३,९७,१४२ रुपये, चांदूर रेल्वे २,३६,७८,१८१ रुपये, चांदूरबाजार २,१९,१०,२०९ रुपये, चिखलदरा ३६,८९,७७८, दर्यापूर ३२,९८,८६,८५१ रुपये, धामणगाव १ ९०,३१,७६१ रुपये, धारणी १,०४,६४,८४६ रुपये, मोर्शी ७ २२,४३,९६३ रुपये, नांदगाव १,२७,९४,४९८ रुपये, तिवसा ३,८२,४६,९३३ रुपये व वरूड तालुक्यात ९३,११,७९४ रुपयांची भरपाई देण्यात आलेली आहे.
बॉक्स
पीक विम्यात बीड पॅटर्न कोठे?
पीक विम्याच्या भरपाईत शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे बीड जिल्ह्याचा पॅटर्न राबविण्याची विनंती केल्याचे कृत्रिमंत्री दादाजी भुसे यांनी मागील आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर असताना सांगितले होते. यात १० प्रशासकीय खर्च व १० टक्के नफा घेऊन कंपनीद्वारा ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, प्रत्यक्षात मात्र, असे काहीही झालेले नाही.