सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पीक विम्याने पाणी फेरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:12 AM2021-07-31T04:12:38+5:302021-07-31T04:12:38+5:30
पान २ चे लिड नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील २५ हजार ३६ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मागील वर्षी २८ हजार ...
पान २ चे लिड
नांदगाव खंडेश्वर :
तालुक्यातील २५ हजार ३६ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मागील वर्षी २८ हजार ३३० हेक्टर सोयाबीन पिकासाठी २ कोटी २६ लाख ६४ हजार ६४५ रुपयांचा पीक विमा हप्ता भरला होता. ज्या लोकांनी सोयाबीन काढण्याच्या वेळी पावसाने नुकसान झाले, अशा फक्त २६० शेतकऱ्यांनी ऑनलाइन पोर्टलवर तक्रारी नोंदवल्या होत्या. त्यांनाच फक्त ३० लाख ५४ हजार ४०४ रुपयांचा विमा मंजूर झाला आहे.
मागील हंगामात सोयाबीन काढणीच्या वेळी सततच्या पावसाने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले होते. तोंडाशी आलेले पीक काढणीच्या वेळी सततच्या पावसाने मातीत घातले. कित्येकाचे सोयाबीन कुजले. कवडीमोल भावाने बाजारात विकावे लागले होते. शेती मशागतीचा उत्पादन खर्चही निघाला नव्हता. कित्येक शेतकरी शेतात दिवसभर राबतात त्यांनी तक्रारी कुठे व कशा कराव्यात, याचीही बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते. पीक विमा काढला की आपण मोकळे झालो, नुकसान झाल्यास मदत मिळणारच, या आशेवर शेतकरी असतात. पेरणी ते कापणी दरम्यान झालेल्या नुकसानाची तक्रार केली नाही एवढाच त्यांचा दोष असेल, तर त्याबाबत जनजागृती होणेही गरजेचे आहे.
मागील हंगामात तालुक्यातील ७८३ शेतकऱ्यांनी ४६७ हेक्टर मूग पिकाचा विमा काढला होता. त्यांना मात्र ४६ लाख ३४ हजार ४३० रुपये विमा मंजूर झाला. २५५ शेतकऱ्यांनी १४३.७६ हेक्टर उडीद पिकाचा विमा काढला होता. त्यांना १४ लाख ५५ हजार १५६ रुपयांचा विमा मंजूर झाला आहे.
कपाशी पिकासाठी ३ हजार १७७ शेतकऱ्यांनी २ हजार ५३८ हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला होता. यापैकी फक्त १०६७ शेतकऱ्यांना ३५ लाख ४३ हजार ३८१ रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. अद्यापही सोयाबीन उत्पादक शेतकरी मागील वर्षी पीक काढणीच्या वेळी झालेल्या सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचा विमा मिळणार, या आशेवर आहेत.
------------------
गतवर्षी खरबी गुंड शिवारात कुटुंबातील असलेल्या एकूण १६ एकर क्षेत्रासाठी सोयाबीन पिकाचा विमा काढला होता. कापणीच्या वेळी सतत पाऊस आल्याने सोयाबीन कुजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पण, पीक विमा अद्याप मिळाला नाही.
- जीविता विनोद जगताप, सरपंच, वाघोडा
------------
माहुली चोर शिवारातील चार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकाचा गतवर्षी विमा काढला होता. कापणीच्या वेळी भरपूर पाऊस झाल्याने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. उत्पादनातही घट झाली. तरीही पीक विमा मिळाला नाही.
- राजेंद्र सरोदे, शेतकरी, माहुली चोर
------------------
कोठोडा शिवारातील पाच एकर सोयाबीन पिकाचा विमा काढला होता. सततच्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले. पण, पीक विमा मिळाला नाही.
- नितीन इंगोले, शेतकरी, कोठोडा