पीककर्ज बिनव्याजी, पण भरावे लागेल व्याजासह
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: February 21, 2024 09:43 PM2024-02-21T21:43:40+5:302024-02-21T21:43:58+5:30
शेतकऱ्यांमध्ये नाराजी; डीबीटीद्वारे व्याज परतावा होणार खात्यात जमा
अमरावती: नियमित कर्जदाराला अल्पमुदतीत तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी मिळत होते व यावरच्या व्याजाचा परतावा शासनद्वारा बँकेला दिला जातो. आता १३ फेब्रुवारीला सहकार आयुक्त कार्यालयाच्या व्हीसीद्वारे सन २०२३-२४ च्या चालू कर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या खातेदाराकडून मुद्दल अधिक सहा टक्के व्याजासह वसुली करण्याच्या सूचना आहेत. यानंतर शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे व्याजाचा परतावा देण्यात येणार आहे.
बिनव्याजी कर्ज म्हणून अनेक शेतकरी मुदतीत पीक कर्जाचा भरणा करतात. प्रत्यक्षात यावरील सहा टक्के व्याज परतावा शासनद्वारा बँकेकडे जमा केला जातो. यामध्ये केंद्र शासन तीन टक्के व डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे तीन टक्के व्याज सवलत वजा जाता तीन लाखांच्या पीक कर्ज रकमेवर शून्य टक्के व्याज सवलतीचा लाभ कर्ज वसुलीच्या वेळी खातेदारांना दिला जातो.
आता मात्र सहकार आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त सूचनेत सन २०२२-२३ चे प्रस्ताव केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश आहेत; मात्र २०२३-२४ च्या व्याजाची परतफेड डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे बँकांद्वारा शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराचा लाभ न देता मुद्दल व सहा टक्के व्याज अशी कर्जाची वसुली करावी, अशा सूचना आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.