३३ तासांच्या रेल्वे प्रवासानंतर युक्रेनची सीमा पार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 05:00 AM2022-03-02T05:00:00+5:302022-03-02T05:00:53+5:30
जिल्ह्यातील ११ विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. यापैकी दोघे जिल्ह्यात परतले व अन्य नऊ विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. यापैकी रोमानियात पोहोचलेला स्वराज पुंड हा राजधानी बुखारेस्टमधील एका स्वयंसेवी संस्थेच्या शेल्टरमध्ये सोमवारी होता. त्याला मंगळवारी तेथील विमानतळावर नेण्यात आले. विमान केव्हा आहे, याची माहिती नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : युक्रेनमधील युद्धात अडकलेले जिल्ह्यातील काही विद्यार्थी अद्याप सीमापार व्हायचे आहेत. यासाठी ३३ तासांचा रेल्वे प्रवास करावा लागत आहे. एक विद्यार्थी सोमवारी रोमानियात पोहोचला व तो राजधानी बुखारेस्ट येथील विमानतळावर असल्याचे त्याने सांगितले. एकंदर स्थिती पाहता या विद्यार्थ्यांच्या भारतात परतण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जिल्ह्यातील ११ विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. यापैकी दोघे जिल्ह्यात परतले व अन्य नऊ विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. यापैकी रोमानियात पोहोचलेला स्वराज पुंड हा राजधानी बुखारेस्टमधील एका स्वयंसेवी संस्थेच्या शेल्टरमध्ये सोमवारी होता. त्याला मंगळवारी तेथील विमानतळावर नेण्यात आले. विमान केव्हा आहे, याची माहिती नाही. मात्र, एकदोन दिवसात मुंबईत पोहोचू. असे तो म्हणाला.
अन्य विद्यार्थीदेखील रोमानियाच्या सीमेकडे निघाले असल्याचे स्वराजने सांगितले. ते एक-दोन दिवसांत सीमा पार करतील. या देशात भारतीय नागरिकांना सहकार्य मिळत आहे. बऱ्याच भागात सध्या नेटवर्कची समस्या असल्याचे तो म्हणाला.
झापरोझिया विद्यापीठाचे विद्यार्थी रेल्वेने
युक्रेनमधील झापरोझिया मेडिकल विद्यापीठाचे १२०० विद्यार्थी तब्बल ३३ तासांचा रेल्वे प्रवास करून युक्रेनची सीमापार करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. यामध्ये काही विद्यार्थी हे अमरावती जिल्ह्यातील आहे. या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांशी नियंत्रण कक्षाद्वारे नियमित संवाद सुरू असल्याचे सांगण्यात आले.