धामणगाव मतदारसंघात इच्छुकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:44 PM2019-07-02T22:44:44+5:302019-07-02T22:45:09+5:30
विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजायला केवळ तीन महिने शिल्लक आहेत. यामुळे धामणगाव रेल्वे मतदारसंघात इच्छुकांच्या आशा-अपेक्षांना धुमारे फुटले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजायला केवळ तीन महिने शिल्लक आहेत. यामुळे धामणगाव रेल्वे मतदारसंघात इच्छुकांच्या आशा-अपेक्षांना धुमारे फुटले आहेत.
धामणगाव, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर असे तीन तालुके आणि पहिले ते शेवटचे टोक यात दीडशे किलोमीटर अंतर व्यापलेल्या ३ लाख ११ हजार ६१४ मतदारसंख्येचा धामणगाव विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचे मागील तीन टर्मपासून काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप हे प्रतिनिधित्व करीत आहेत. गत विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चांदूर रेल्वे येथे भाजपचे उमेदवार अरुण अडसड यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. तरीही अडसड यांचा ९८४ मतांनी पराभव करीत आमदार वीरेंद्र जगताप यांनी हॅट्ट्रिक साधली.
यंदा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून बहुधा उमेदवार बदलला जाणार नाही. त्यामुळे जगताप हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात राहतील, हे निश्चितच आहे. अडसड यांना विधान परिषदेचे सदस्यत्व मिळाल्यामुळे भाजपकडून त्यांचे पुत्र तथा धामणगावचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.
इच्छुकांची वाढली गर्दी
धामणगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे हेदेखील भाजपकडून स्पर्धेत आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मांजरी म्हसला सर्कलमधून गतवेळचे जिल्हा परिषद सदस्य अभिजित ढेपे व धामणगाव बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक रामदास निस्ताने यांनी जनसंपर्क वाढविला आहे. घुईखेड सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुईखेडकर यांनी आतापर्यंत दोनवेळा मतदारसंघ पिंजून काढल्याची माहिती आहे. चांदूर रेल्वे येथील जय हिंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांनीही मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. यवतमाळ येथील डॉ. संदीप धवणे यांनी धामणगाव विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागात आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आपली ओळख प्रस्थापित करीत आहेत.
नऊ लोकप्रतिनिधींनी केले नेतृत्व
धामणगाव विधानसभा मतदारसंघापूर्वी मध्य प्रदेशात तिवसा मतदारसंघ असलेल्या या भागाने दहा लोकप्रतिनिधी दिले आहेत. सन १९५१ मध्ये हा भाग मध्यप्रदेशात असताना भारतीय काँग्रेस पक्षाचे भाऊराव गुलाबराव जाधव हे दोन वेळा आमदार राहिले. यानंतर पुंडलिक रामकृष्ण चोरे यांनी प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्रात वºहाड प्रांत सहभागी झाल्यानंतर सन १९७२ मध्ये धामणगाव रेल्वे मतदारसंघ अस्तित्वात आला. काँग्रेसचे शरद तसरे त्यावेळी विधानसभेत निवडून गेले. सन १९७८ मध्ये काँग्रेस पक्षाचे सुधाकर सव्वालाखे, तर सन १९८० मध्ये काँग्रेसचे यशवंतराव शेरेकर निवडून आले होते. सन १९९० व १९९९ मध्ये भाजपचे अरुण अडसड यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. सन १९९५ मध्ये जनता दलाचे डॉ. पांडुरंग ढोले विजयी झालेत. सन २००४ पासून काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांनी हा मतदारसंघ आपल्याकडे सलग तीनदा राखला.