देशी दारू दुकानातील गर्दी ओसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 05:00 AM2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:01:28+5:30
लॉकडाऊन जाहीर होताच केवळ अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळता, इतर व्यवसायांना प्रतिबंध घालण्यात आला. त्यानुसार अधिकृत दारूविक्री बंद होताच देशी-विदेशी दारू पिणाऱ्या तळीरामांनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळविला. गावठी दारूची मागणी वाढताच विक्रेत्यांनी भाववाढ करायला सुरुवात केली. एरवी ३०-४० रुपयांना विकली जाणारी हातभट्टीची दारू शंभर ते दीडशे रुपये प्रतिलिटर भावात विकली जाऊ लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बेनोडा (शहीद) : गावात ८ मे रोजी वाजतगाजत सुरू झालेल्या देशी दारू दुकानापुढील गर्दी आठवडाभरातच ओसरली. मोठ्या खंडानंतर मिळालेल्या दारूचा उत्साहात आस्वाद घेतला. मात्र, आठवडा होत नाही तोच व्यसनावर दुष्काळ भारी पडला. दारूड्यांचा उत्साह पैशांच्या टंचाईमुळे मावळला आहे.
लॉकडाऊन जाहीर होताच केवळ अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळता, इतर व्यवसायांना प्रतिबंध घालण्यात आला. त्यानुसार अधिकृत दारूविक्री बंद होताच देशी-विदेशी दारू पिणाऱ्या तळीरामांनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळविला. गावठी दारूची मागणी वाढताच विक्रेत्यांनी भाववाढ करायला सुरुवात केली. एरवी ३०-४० रुपयांना विकली जाणारी हातभट्टीची दारू शंभर ते दीडशे रुपये प्रतिलिटर भावात विकली जाऊ लागली. देशी-विदेशी मद्याची दुकाने बंद असल्याने तळीरामांनी लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील जंगलात जाऊन मनमुराद हातभट्टी रिचविली. अव्वाच्या सव्वा दरात तलफ भागविण्यासाठी तळीरामांनी खिशात होता-नव्हता तेवढा पैसा खर्च केला.
बेनोड्यातील देशी दारू दुकानात प्रामुख्याने परिसरातील शेतमजुरांची वर्दळ असते. कोरोनानंतरचे लॉकडाऊन आणि अस्मानी दुष्काळाच्या धर्तीवर शेतकऱ्यांनी अत्यावश्यक कामांशिवाय इतर कामे स्थगित केली. मजुरांच्या हाताला दररोजच्या कामाची शाश्वती राहिली नाही. पर्यायाने रोजगार कमी झाल्याने अपेक्षित पैसा हातात पडत नसल्याने तळीरामांकडे दारू खरेदी करायला पुरेसा पैसा नाही. दुकाने बंद असताना अवैध विक्रेत्यांकडून दीडशे ते दोनशे रुपयांत खरेदी केलेली पावटी आता ६० रुपयांना मिळत असतानाही पैशांअभावी विकत घेऊ शकत नसल्याचे शल्य तळीरामांच्या चेहºयावर स्पष्टपणे दिसून येत आहे.
काहीजण बंदीच्या काळात नाहक पैसा खर्च केला, अन्यथा आज चांगला उपयोगात आणता आला असता, गावठी दारूवर केलेल्या खर्चात आज विदेशी मद्याचे सेवन केले असते, अशी पश्चात्तापाची भावना व्यक्त करीत आहेत.