काटकुंभच्या ‘मेघनाथ यात्रेत’ गर्दी
By admin | Published: March 28, 2016 12:11 AM2016-03-28T00:11:44+5:302016-03-28T00:11:44+5:30
आदिवासींचा सर्वात मोठा सण होळी. मेळघाटात हा उत्सव पाच दिवस साजरा करण्यात आला.
आदिवासींची संस्कृती : शेकडोंनी फेडले नवस, आदिवासींचा जल्लोष
नरेंद्र जावरे चिखलदरा
आदिवासींचा सर्वात मोठा सण होळी. मेळघाटात हा उत्सव पाच दिवस साजरा करण्यात आला. होळीचे औचित्य साधून शनिवारी काटकुंभ येथे रावणपुत्र मेघनाथाची एक दिवसीय यात्रा जल्लोषात साजरी करण्यात आली. शेकडोंनी या यात्रेत नवस फेडले, तर काहींनी मनातल्या सुप्त इच्छांच्या पूर्ततेसाठी नवस कबूल केले. सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये या यात्रेमुळे आनंदाला उधाण आले होते.
यात्रेमध्ये रावणपुत्र मेघनाथाची पूजा आदिवासींनी केली. यावेळी जेरीचा लांब एक खांब गावशिवारावर रोवला जातो. त्यालाच मेघनाथ असे संबोधले जाते. मेळघाटात मोठ्या प्रमाणात आदिवासी, कोरकू व गोंड जमातीचे वास्तव्य आहे. हे आदिवासी आही पुरातन संस्कृतीला जपतात. होळी या सर्वात मोठ्या सणाच्या निमित्ताने आबालवृद्धांसाठी नवीन वस्त्र परिधान खरेदी केले जाते. गोडधोड जेवणाच्या भोजनावळी झडतात.
मेघनाथ पूजेचे महत्त्व
गावशिवारावर तयार केलेला जेरीचा लांब गगनभेदी खांब म्हणजे रावणपुत्र मेघनाथ. शुक्रवारी जारिदा, शनिवारी काटकुंभ येथे मेघनाथयात्रा भरली होती. वर्षभर रोजगारासाठी बाहेरगावी गेलेले आदिवासी होळीनिमित्त गावी परतले होते. त्यामुळे गावांमध्ये वर्दळ होती. मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी मेघनाथ यात्रेत नवस फेडण्याची प्रथा प्राचीन काळापासून आहे. मेघनाथाच्या पायथ्याशी काटकुंभ येथील भूमका कालू सुभाजी बेठेकर यांनी पूजाअर्चा केली. नंतर एका शिडीवरून वर चढविण्यात आले. आडव्या खांबाला दुपट्ट्याने बांधून प्रदक्षिणा घालून नवस फेडले गेला. वर्षपरंपरेनुसार काटकुंभ व परिसरातील ६० पेक्षा अधिक खेड्यांतील शेकडो आदिवासींनी हजेरी लावली होती.