मेळघाट नाईट सफारीला गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:03 PM2017-11-06T23:03:17+5:302017-11-06T23:03:38+5:30
मेळघाटात पर्यटकांची गर्दी वाढीस लागून स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी व्याघ्र प्रकल्पाने नाइट सफारी सुरु केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेळघाटात पर्यटकांची गर्दी वाढीस लागून स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी व्याघ्र प्रकल्पाने नाइट सफारी सुरु केली आहे. या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी पर्यटकांना दोन बिबट्याचे दर्शन झाले. अकोट वन्यजीव विभागांतर्गत जंगल सफारीला पर्यटकांची पसंती असल्याचे दिसून येते.
ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत पर्यटकांची संख्या वाढविण्यात माघारलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने आता नाईट सफारी उपक्रम सुरू करून उणिवा भरून काढण्यासाठीच्या उपाययोजना शोधल्या आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांनी अकोट, सिपना व गुगामल वन्यजीव विभागांतर्गत नाइट सफारी सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. पहिल्या टप्प्यात नरनाळा अभयारण्यात नाइट सफारी सुरू झाली आहे. नरनाळ्यात वाघ, बिबट्यासह अन्य वन्यपशूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या तुलनेत मेळघाटात पर्यटक येत नसल्याचे वास्तव आहे. मेळघाटात पर्यटक आले, तर स्थानिक आदिवासींनादेखील रोजगाराचे दालन उपलब्ध होईल. हा उद्देश बाळगून व्याघ्र प्रकल्पाने नाईट सफारीची संकल्पना पुढे आणली आहे. नरनाळा अभयारण्याच्या बफर क्षेत्रातील शहानूर ते पालधरी, पालधरी ते अमोना असा जंगल सफारी मार्ग निश्चित झाला आहे. ही सफारी २० कि.मी. अंतराची असून, सायंकाळी ७.३० ते ११.३० तर पहाटे ४ ते ६.३० दरम्यान पर्यटकांना वन्यप्राणी बघता येतील.
पहिल्या टप्प्यातील जंगल सफारीचा आनंद इंदूर येथील पर्यटकांनी घेतला. या पर्यटकांना दोन बिबट्यांसह सांबर, गवा, रानडुक्कर, हरिण, काळवीट आदी वन्यपशू बघता आले. नाइट सफारीचा शुभारंभ अकोट येथील न्यायमूर्ती अनिल सुब्रमण्यम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, सहायक वनसंरक्षक सुरेश खराटे आदी वनकर्मचारी उपस्थित होते.
९०० रुपयांत नाइट सफारी
मेळघाटात नाइट सफारीसाठी ९०० रुपये मोजावे लागतील. यात ६०० रुपये जिप्सीचे, तर ३०० रुपये गाईडचे आकारले जातील. निवास व्यवस्थेसाठी दरदिवसाला १२०० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. नाइट सफारीमध्ये तीनपेक्षा जास्त जिप्सी राहणार नाहीत. येत्या दोन दिवसांत हरिसाल, तारूबांदा परिसरातील जंगलात नाइट सफारी सुरू होणार असल्याची माहिती एम.एस. रेड्डी यांनी दिली.
मेळघाटात पर्यटकांची गर्दी वाढण्यासाठी नाईट सफारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातून स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध होईल. जंगल सफारीचा आनंद घेऊन मेळघाटचे सौंैदर्य न्याहाळावे.
- एम.एस. रेड्डी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प.