रेती तस्करी एजंटची पहाटे जयस्तंभ चौकात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:10 AM2021-06-21T04:10:16+5:302021-06-21T04:10:16+5:30

मोर्शी - येथील जयस्तंभ चौकांमध्ये पहाटे चारच्या सुमारास वरुड मोर्शी व अमरावती येथून येत असलेल्या अवैध रेती ...

Crowd of sand smuggling agents at Jayasthambh Chowk in the morning | रेती तस्करी एजंटची पहाटे जयस्तंभ चौकात गर्दी

रेती तस्करी एजंटची पहाटे जयस्तंभ चौकात गर्दी

Next

मोर्शी - येथील जयस्तंभ चौकांमध्ये पहाटे चारच्या सुमारास वरुड मोर्शी व अमरावती येथून येत असलेल्या अवैध रेती ट्रकची रीघ लागलेली दिसून येते. अवैध रेती वाहतूक करणारे ट्रक टायर्स थंड करण्यासाठी चौकातील रोडवर थांबवून या ठिकाणावरून तालुक्यातील विविध ठिकाणी पोहोचविले जातात.

मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात वाहनक्षमतेपेक्षा अधिक रेतीची तस्करी खुलेआम सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी रेती तस्करीला तालुक्यातील निंभी फाट्याजवळ चाप बसला होता. आता रेती तस्करांनी तोंड वर काढले आहे. प्रशासन डोळेझाक करीत असल्याने यात कुठेतरी पाणी मुरत असल्याची चर्चा आहे. महसूलचे फिरते पथक कुचकामी ठरल्याने महसूल, आरटीओ आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाहतूक सुरू आहे

रेती तस्करी होत असताना रेती तस्करी करणाऱ्यांचे एजंट समोरील रस्ता मोकळा आहे की नाही याची शहानिशा करूनच पुढील मार्गाक्रमण करतात. काही अडचण असल्यास याबाबत सतत सूचना दिली जाते. रेती तस्कर रात्रभर तालुक्यातील नदीनाल्यांना तसेच वर्धा नदी व मध्य प्रदेश या हद्दीत असलेल्या रेतीघाटावर आपली वाहने लावतात व पहाटे चारच्या सुमारास रेती ओव्हरलोड वाहने मार्गाक्रमण करतात. काही दिवसांपूर्वी एका आयपीएस अधिकाऱ्याने एकाच दिवशी काही डंपर जप्त करून वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता; परंतु स्थानिक प्रशासन याबाबत कुठलीही दखल घेत नसल्याने कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय नागरिकांतून वर्तविला जात आहे.

गेल्या दोन वर्षांपासून रेती घाटांचे लिलाव झाले नसले तरी तालुक्यासह शहरामध्ये घरकुल बांधकामासह अधिकतम घर बांधकामे सुरू आहेत. तरी यांच्याकडे रेती कुठून येते हा प्रश्न अनुत्तरित असून बांधकामधारकास चढ्या दराने रेती मिळत असल्याचे बोलले जाते.

.......................

महसूल पथके रेती तस्करांच्या सातत्याने मार्गावर असतात; त्यामुळे बहुतांश ट्रक, ट्रॅक्टर, डंपर मालकांवर कारवाई झालेली असून कारवाई करणे सुरू आहे.

- सिद्धार्थ मोरे

तहसीलदार मोर्शी

Web Title: Crowd of sand smuggling agents at Jayasthambh Chowk in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.