मंदिरात उसळली भक्तांची गर्दी तीर्थ, प्रसाद नाही, केवळ दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 05:00 AM2020-11-17T05:00:00+5:302020-11-17T05:00:19+5:30
अंबादेवी व एकवीरा देवीचे मंदिर सकाळी ६ पासून भाविकांसाठी खुले करण्यात आले. दिवाळी उत्सवामुळे पहाटे व्यापाऱ्यांनी अंबादेवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पाडव्याला व्यापारी वर्ग श्रद्धेपोटी देवीचे नारळ आणि देणगीस्वरूपात दिलेल्या पैशांची पावती तिजाेरीत वर्षभर ठेवतात, अशी माहिती अंबादेवी मंदिर संस्थानचे सचिव रवींद्र कर्वे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संसर्गामुळे तब्बल आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारपासून प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली करण्यात आली. पहिल्याच दिवशी प्रसिद्ध अंबा व एकवीरादेवी मंदिरात हजारो भाविकांनी दर्शन घेतले. मात्र, भाविकांना प्रसाद, तीर्थ, ओटी भरणे, अभिषेक अथवा मंदिराभोवती प्रदक्षिणा करण्यास मनाई करण्यात आली. गुरुद्धारा, चर्च, मशिदीसह अन्य प्रार्थनास्थळीही पूजा-अर्चासाठी सुरू झाली आहे.
अंबादेवी व एकवीरा देवीचे मंदिर सकाळी ६ पासून भाविकांसाठी खुले करण्यात आले. दिवाळी उत्सवामुळे पहाटे व्यापाऱ्यांनी अंबादेवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पाडव्याला व्यापारी वर्ग श्रद्धेपोटी देवीचे नारळ आणि देणगीस्वरूपात दिलेल्या पैशांची पावती तिजाेरीत वर्षभर ठेवतात, अशी माहिती अंबादेवी मंदिर संस्थानचे सचिव रवींद्र कर्वे यांनी दिली. सकाळी ६ ते रात्री ८ दरम्यान हजारो भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज मंदिर संस्थांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पुजाऱ्यांना फेस शिल्ड, हॅन्ड ग्लोव्ह्ज
कोरोना संसर्गाचा धोका कायम असल्याने अंबा व एकवीरादेवी मंदिरातील पुजाऱ्यांना सुरक्षिततेकरिता फेस शिल्ड, हॅन्ड ग्लोव्ह्ज अनिवार्य करण्यात आले आहे. गाभाऱ्यात पुजाऱ्याशिवाय कोणालाही प्रवेश असणार नाही. भाविकांना मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर या बाबी बंधनकारक केल्या आहेत.
ओटीचे साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा
देवीला ओटी भरण्यासाठीचे साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आली आहे. महिला भाविकांना अंबा व एकवीरा देवीला ओटी भरण्याचे साहित्य मंदिरात सोबत नेता येणार नाही. मंदिराच्या बाहेरील भागातच ओटीचे साहित्य ठेवण्याची जागा निश्चित केली आहे.
भाजप, मनसेचा आनंदोत्सव
मंदिर भाविकांसाठी खुले झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप, मनसेने सोमवारी अंबा व एकवीरा देवी मंदिराबाहेर आनंदोत्सव साजरा केला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अंबादेवी मंदिर संस्थानतर्फे श्रीकांत भारतीय यांचा शाल-श्रीफळ देऊन प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
मंगळवारी लक्षणीय गर्दीची शक्यता
अंबा व एकवीरा देवीचे मंदिर आठ महिन्यांपासून बंद होते. शासनाने मार्गदर्शक सूचना जारी करून सर्व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली केली. मंदिर आठ महिन्यांनंतर खुले केल्यानंतर पहिल्या मंगळवारी १७ नोव्हेंबर रोजी दर्शनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यानुसार मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले आहे. स्त्री-पुरुष भाविकांना स्वतंत्र्यपणे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोना नियमावलीचे पालन करूनच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. भक्तांनी देवीचे दर्शन घेतले. मंदिराला फुलांनी सजविले असून, दिव्यांची लक्षणीय आरास मांडण्यात आली.
- चंद्रशेखर कुळकर्णी, सचिव, एकवीरा देवी संस्थान.