सामाजिक न्याय विभागात ‘व्हॅलिडिटी’साठी गर्दी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:12 AM2020-12-22T04:12:47+5:302020-12-22T04:12:47+5:30
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नियोजन, विद्यार्थी अन् ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारांसाठी टोकन प्रणाली अमरावती : शाळा, महाविद्यालयीन निकाल आणि ग्रामपंचायत निवडणुकीचे ...
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नियोजन, विद्यार्थी अन् ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारांसाठी टोकन प्रणाली
अमरावती : शाळा, महाविद्यालयीन निकाल आणि ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच आता जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धावाधाव सुरु झाली आहे. त्याअनुषंगाने येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जातवैधता प्रमाणपत्र कार्यालयात गर्दी वाढत आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विद्यार्थी अन् उमेदवारांना टोकन दिले जात आहे.
मार्चपासून कोरोना संसर्ग सुरू होताच समाजकल्याणमध्ये विविध कामांचे नियोजन करण्यात येत आहे. अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी ‘व्हॅलिडिटी’ मिळविण्यासाठी येणाऱ्यांना टोकन देऊन कामांचे स्वरुप निश्चित केले जात आहे. कोरोना काळात ‘व्हॅलिडिटी’साठी ऑनलाईन अर्ज सादर करताना गर्दी नव्हती. मात्र, गत दीड महिन्यांपासून येथे गर्दी वाढत आहे. अशातच ग्रामपंचायत निवडणुकीने यात भर घातली आहे. मुख्य प्रवेशद्धाराबाहेरच उमेदवारांना टोकन आणि वेळ दिला जात असल्याने त्याच काळात ‘व्हॅलिडिटी’ मिळविता येते, असे कामांचे नियोजन आखले आहे. कोरोना संसर्ग पसरू नये, यासाठी कटाक्षाने काळजी घेतली जात आहे. मास्कविना प्रवेश नाही, अशी काटेकोरपणे नियमावली लागू करण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थी आणि उमेदवार यांना एकाच रांगेत टोकन घेण्यासाठी उभे करण्यात येत असल्याने काही विद्यार्थ्यांनी या नियोजनावर आक्षेप घेतला आहे. प्रवेशाची तारीख जवळ येत असल्यामुळे विद्यार्थी ‘व्हॅलिडिटी’साठी गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. यात अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमु्क्त जाती आणि भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
-----------------------------
जातवैधता प्रमाणपत्रासाठी टोकन प्रणाली
‘व्हॅलिडिटी’साठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर ऑफलाईन कागदपत्रे प्रत्यक्षात सादर करावी लागत आहे. मात्र, फेब्रुवारी, मार्चमध्ये अर्ज सादर केले अर्जदारांना आता अर्ज करण्याची गरज नाही, ही बाब जातवैधता प्रमाणपत्र विभागाने स्पष्ट केली आहे. सोमवारी ‘व्हॅलिडिटी’साठी ४२६ अर्ज घेण्यात आले आहे. टोकनशिवाय अर्ज स्वीकारले जात नाही, असे नियोजन आहे.
-----------------------
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. त्याकरिताच टोकन प्रणाली लागू केली आहे. रांगेतील उमेदवारांना टोकन देताना त्यांच्या कामाची वेळदेखील निश्चित केली जाते. त्यामुळे नियोजित वेळेनुसार कामांना प्राधान्य दिले जात आहे.
- सुनील वारे, उपायुक्त, जातवैधता प्रमाणपत्र कार्यालय, अमरावती