पहिल्याच दिवशी जीवनावश्यक वस्तूसांठी मार्केटमध्ये गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 05:00 AM2021-05-24T05:00:00+5:302021-05-24T05:00:54+5:30
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारपासून जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला व दूध डेअरी आदी दुकानांना सकाळी ७ ते दुपारी ११ या कालावधीत सुरू ठेवण्यास मुभा दिलेली आहे. तीन आठवड्यांपासून जिल्हा लॉकडाऊन असल्याने रविवारी सकाळी आवश्यक ते सामान घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. याशिवाय मुख्य मार्गाव्यतिरिक्त अंतर्गत भागात मनाई असलेली दुकानेदेखील सुरू होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तीन आठवड्यांच्या कठोर संचारबंदीनंतर रविवारपासून रोज सकाळी ११ पर्यंत मुभा देण्यात आल्याने जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली. प्रशासनाद्वारे प्रमुख चौकांत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना अटकाव करण्यात आला. काही ठिकाणी अशा व्यक्तींच्या कोरोना चाचण्यादेखील करताना दिसून आले.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारपासून जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला व दूध डेअरी आदी दुकानांना सकाळी ७ ते दुपारी ११ या कालावधीत सुरू ठेवण्यास मुभा दिलेली आहे. तीन आठवड्यांपासून जिल्हा लॉकडाऊन असल्याने रविवारी सकाळी आवश्यक ते सामान घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. याशिवाय मुख्य मार्गाव्यतिरिक्त अंतर्गत भागात मनाई असलेली दुकानेदेखील सुरू होती. काही व्यापारी संकुलाच्या आतील भागातील दुकाने सुरू असलेली आढळून आली. महापालिकेचा बाजार व परवाना विभाग तसेच अतिक्रमण विभागाच्या पथकांद्वारे अशा काही दुकांनावर कारवाया करण्यात आल्या. महापालिका आयुक्त, उपायुक्त, पोलीस आयुक्त, उपायुक्त यांनी प्रामुख्याने सर्वाधिक गर्दी असणाऱ्या चित्रा चौक व इतवारा भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला व पथकांना आवश्यक ते निर्देश दिले.
चित्रा चौक, भाजीबाजारात चाचणी
नागरिकांची सर्वाधिक गर्दी राहणाऱ्या चित्रा चौक, इतवारा भागात भाजी विक्रेत्यांसह काही नागरिकांच्या महापालिकेच्या आरोग्य पथकाद्वारे रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या. महापालिका व पोलीस पथक रस्ते व दुकांनामध्ये गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेताना आढळले. सकाळी ११ नंतर उघडी असलेल्या दुकांनांच्या संचालकांना तंबी देऊन बंद करण्यास फर्मावण्यात आले.
हातगाड्यांना पथकाचा मज्जाव
शहरात भाजीविक्रेत्यांना झोननिहाय जागा देण्यात आलेल्या असल्याने रस्त्यावर भाजीपाल्याच्या हातगाड्या लावण्यास महापालिकेच्या पथकाद्वारे मनाई करण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने व अंतर्गत भागात हातगाडी विक्रेता दिसल्यास त्याला संबंधित ठिकाणी पाठविण्यात आले. याशिवाय या विक्रेत्यांनी कोरोना चाचणी करण्याविषयी सांगण्यात आले.
११ नंतर फिरण्यास नागरिकांना मनाई
सकाळी ११ नंतर संचारबंदी लागू होत असल्याने रस्त्यावर दिसणाऱ्या नागरिकांना हटकण्यात आले. याशिवाय विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणीदेखील करण्यात आली. विहित कालावधीनंतर सुरू असणाऱ्या दुकानांबाबत महापालिकेच्या पथकांसह पोलिसांनीदेखील तंबी देऊन ती दुकानदारांना बंद करायला लावल्याचे दिसून आले.